रिझर्व्ह बँकेनं देशाच्या युपीआय पेमेंट्स प्रणालीत तीन नवीन बदलांचं सूतोवाच केलं आहे. हे बदल प्रत्यक्षात येतील तेव्हा युपीआय प्रणालीचा देशातला चेहरा मोबराच बदलू शकेल. किंवा या बदलांनंतरची युपीआय प्रणाली ही आधुनिक म्हणजे दुसऱ्या पिढीतील प्रणाली असेल.
प्रस्तावित तीन बदल आहेत संवादात्मक युपीआय, युपीआय लाईटचा विस्तार आणि ऑफलाईन युपीआय पेमेंट्स. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण मांडताना युपीआय प्रणाली बद्दलही सविस्तर माहिती दिली. आपणही युपीआयमधील तीन प्रस्तावित बदलांबद्दल जाणून घेऊया,
संवादात्मक युपीआय पेमेंट्स
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता युपीआय प्रणालीमध्येही होऊ पाहतो आहे. इथं युपीआयचा वापर करणारा ग्राहक युपीआय प्रणालीशी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संवाद साधू शकेल. फक्त बटनं दाबणं किंवा एखाद्या संगणकीय प्रोग्रामच्या मदतीने व्यवहार पूर्ण करण्यापेक्षा त्याला संवादाचं स्वरुप देण्यावर सध्या काम सुरू आहे.
व्यवहाराची सुरक्षितता वाढणार असल्याचा रिझर्व्ह बँकेचा दावा
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळ ग्राहकाला व्यवहार करताना मार्गदर्शनही मिळेल आणि त्यातील रुक्षता कमी होईल, असं मध्यवर्ती बँकेचं म्हणणं आहे. सुरुवातीला स्मार्ट फोनवर ही प्रणाली वापरता येईल. इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये संवादात्मक युपीआय उपलब्ध असेल. पण, हळू हळू इतर भारतीय भाषांमध्ये तिचा प्रसार होईल. संवादात्मक युपीआयमुळे जे तंत्रजान वापरायला घाबरतात अशा लोकांनाही ते वापरणं सोपं जाईल असं मत या क्षेत्रातील जाणकारांनीही व्यक्त केला आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)
युपीआय लाईटची मर्यादा वाढवली
त्याच बरोबर रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाईटची व्याप्तीही वाढवली आहे. युपीआय लाईटवर आता २०० ऐवजी ५०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात युपीआय लाईट सेवा सुरू करण्यात आली होती. छोट्या रकमेचे व्यवहार पिन कोड किंवा इतर कुठल्याही अडथळ्याशिवाय इथं करता येतात. असे व्यवहार करताना दोन पायऱ्यांमध्ये करावं लागणारं प्रमाणिकरण करावं लागत नाही (two factor authentification). आता ५०० रुपयांपर्यंतचे व्यवहार युपीआय लाईट वापरून करता येणार आहेत. जिथे इंटरनेटची उपलब्धता आणि त्याचा वेग कमी आहे, तिथे या सेवेचा उपयोग होणार आहे. भिम, पेटीएम, गुगल पे आणि इतर बँकांच्या युपीआय ॲपवरही युपीआय लाईट सेवा उपलब्ध आहे.
ऑफलाईन युपीआय पेमेंट
युपीआय व्यवहार ऑफलाईन करता येणं ही रिझर्व्ह बँकेची ग्राहकांना मोठी देण असेल. म्हणजे इंटरनेट किंवा टेलिफोन सेवा सुरू नसतानाही युपीआय प्रणाली वापरणं शक्य होणार आहे. त्यासाठी निअर फिल्ड कम्युनिकेशन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यात आर्थिक व्यवहारांसाठी लागणारा वेळही खूप कमी आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी पडला तरी NFC च्या माध्यमातून व्यवहार तातडीने पूर्ण करता येईल. कारण इंटरनेटचा वेग कमी असेल तर अनेकदा व्यवहार पूर्ण होत नाही. पण, ती भीती आता राहणार नाही.
युपीआय लाईट तसंच ऑफलाईन पेमेंटची सुविधाही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडूनच देण्यात येणार आहे. आणि NPCI कडून लवकरच तशी घोषणा करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community