भायखळा येथील जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कमालीचे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बांधकामाचे कंत्राट स्वीकारलेल्या खासगी कंपनीकडून केवळ २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कंपनीला वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेली मुदत जुलै महिन्यातच संपली आहे. आता कंपनीला मुदत वाढवून द्यायची की नाही याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या महिन्यातही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाबाबत जे. जे. रुग्णालय प्रशासनाची तातडीची बैठक बोलावून संबंधित कंपनीबाबत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. जे. जेत रुग्णसेवेचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णालयात दर दिवसाला ७ ते ९ हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात. उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. परिणामी, जे. जेत रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी उपचार विभाग आणि शस्त्रक्रिया विभाग वाढवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला.
(हेही वाचा – प्राथमिक शाळांमध्ये शिकवले पाहिजे Good Touch, Bad Touch; व्हिडिओ होतोय व्हायरल)
या नव्या बांधकामानंतर जे. जेत अधिक २००२ रुग्णांना रुग्णसेवा देता येईल. याबाबतीत २१ जुलै २०२० रोजी इमारत बांधकामासाठी खासगी कंत्राटदार नेमला गेला. तीन वर्षात बांधकाम पूर्ण अपेक्षित असताना प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नसल्याने कंत्राटदाराची नियुक्ती रद्दबादल होण्याची शक्यता जास्त आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. कंत्राटदार बांधकामासाठी अजून दोन वर्षांचा अवधी मागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयचे अधिकारीही बांधकामाचा पाठपुरावा करण्यासाठी जे. जे. रुग्णालयाला भेट देत आहेत. बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. परंतु कंत्राटदाराबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community