Wrestlers Protest : बजरंग पुनिया, विनेश आणि साक्षी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

१२ तारखेच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या पॅनलचा विजय नक्की समजला जातोय

168
Wrestlers Protest : बजरंग पुनिया, विनेश आणि साक्षी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
Wrestlers Protest : बजरंग पुनिया, विनेश आणि साक्षी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
  • ऋजुता लुकतुके

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरन यांच्याविरोधात जंतर मंतर इथं आंदोलनाला बसलेले भारतीय कुस्तीपटू पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. १२ तारखेच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या पॅनलचा विजय नक्की समजला जातोय. त्यावरून बजरंग, विनेश आणि साक्षीने हे पाऊल उचललं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गुरुवारी त्यांनी एकत्र येऊन दिल्लीत राजघाट इथं पत्रकार परिषद घेण्याचाही प्रयत्न केला. पण, दिल्ली पोलिसांनी जमाव बंदीचं कलम १४४ लागू करून त्यांना रोखलं.

आताही कुस्तीपटूंचा विरोध ब्रिजभूषण शरन यांनाच आहे. कुस्ती महासंघाच्या १२ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीत शरन यांचं पॅनल विजयी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण, त्यांना २५ पैकी २० राज्य संघटनांचा पाठिंबा आहे. तसं झालं तर ब्रिजभूषण यांचा पाठिंबा असलेले संजय सिंग कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होतील आणि संजय सिंग अध्यक्ष झाले तर ब्रिजभूषण यांची चौकशी किंवा त्यांच्यावरील कारवाई नि:पक्षपणे होणार नाही, असं कुस्तीपटूंना वाटतंय. त्यामुळेच १२ तारखेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. विनेश, बजरंग आणि साक्षी यांनी राजघाट इथं गुरुवारी पत्रकार परिषद घेत असल्याचं ट्विटरवर जाहीर केलं.

पण, या ट्‌विटनंतर लगेचच मध्य दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी ट्विटवरच मध्य दिल्लीत जमावबंदी लागू होत असल्याचं जाहीर केलं. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेसाठी मध्य दिल्ली, आयटीओ (ITO) तसंच लाल किल्ला परिसरात जमाव बंदीचं कलम १४४ लागू करण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारच्या जमावाला किंवा गर्दीला परवानगी नाही.

(हेही वाचा – पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाच नाही; १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी तात्पुरती सोय)

यानंतर कुस्तीपटूंनी इतरही काही ठिकाणी आपली पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आलं नाही. आता शुक्रवारी खेळाडूंकडून नवीन जागी पत्रकार परिषद होणार आहे. पण, तिची वेळ आणि स्थळ ऐनवेळी कळवण्यात येईल. पण, कुस्तीपटूंचा विरोध ब्रिजभूषण शरण यांच्या पॅनलला आहे हे उघड आहे. या निवडणूक प्रक्रियेत आपल्या पॅनलला निवडून देण्यासाठी ब्रिजभूषण शरण इतरांवर दबाव आणत असल्याचं या कुस्तीपटूंचं म्हणणं आहे. तसंच ब्रिजभूषण यांचं पॅनल निवडून येऊ नये यासाठी केंद्रसरकार किंवा साईकडून काही मदत मिळत नसल्याचंही या कुस्तीपटूंनी खाजगीत बोलून दाखवलं आहे. ब्रिजभूषण यांनी एकाधिकारशाहीने कुस्तीचा कारभार चालवल्याचा या खेळाडूंचा आरोप आहे. आणि तरीही तेच किंवा त्यांचं पॅनल निवडून आलं तर कुस्तीला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी खेळाडूंनी यापूर्वी केलेलं आंदोलन निरर्थक ठरेल असं त्यांना वाटतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.