- ऋजुता लुकतुके
एअर इंडियाची मालकी टाटा कंपनीकडे गेल्यावर कंपनीचा लोगो बदललाय. ताफ्यात नवीन विमानं दाखल होतायत. पण, या सगळ्यात जुन्या एअर इंडियातला महाराजा कायम राहणार असल्याचं कंपनीचे कार्यकारी अधिकारी कँपबेल विल्सन यांनी स्पष्ट केलंय. एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेल्यावर अनेक बदल प्रस्तावित आहेत. कालच (१० ऑगस्ट), कंपनीने नवीन लोगो, अत्याधुनिक एअर बस विमानं याविषयीची माहिती पत्रकारांना दिली. यात एअर इंडियाची सेवा अत्याधुनिक आणि जागतिक विमान वाहतुकीला साजेशी कशी असेल याविषयी कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि कार्यकारी अधिकारी विल्सन यांनी विस्ताराने सांगितलं.
पण, त्यामुळे उपस्थितांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला १०४६ म्हणजे कंपनीच्या स्थापनेपासून एअर इंडिया ब्रँडच्या जवळ असलेला महाराजाचं काय होणार? कंपनीचा नवीन लोगो द विस्टाचं अनावरण काल झालं. त्यानंतर तर हा प्रश्न आणखी ऐरणीवर आला. पण, त्या कार्यकारी अधिकारी कँपबेल विल्सन यांनी उत्तर दिलंय. ‘महाराजाचा मृत्यू झालाय ही फक्त अफवा आहे. तसं काही होणार नाही. उलट महाराजालाही नवीन आणि तंदुरुस्त चेहरा मिळणार आहे. त्याच्या लाल रंगात आता सोनेरी आणि जांभळा रंग मिसळणार आहे,’ विल्सन यांनी कंपनीच्या नवीन ब्रँड धोरणाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितलं.
(हेही वाचा – MGNREGA scheme : मनरेगा योजनेतून ५० मजूर जोडप्यांची निवड)
त्याचबरोबर त्यांनी हे ही स्पष्ट केलं की, महाराजा ही एअर इंडियाची देशांतर्गत ओळख आहे. ती जागतिक विमानसेवेत राहणार नाही. ‘महाराजा ही कंपनीची देशातील ओळख आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवेत तो प्रामुख्याने वापरला जाईल. पण, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत तशीही महाराजाची ओळख नव्हतीच आणि आताही कंपनीला निर्माण करायची नाही. तिथं आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा विचार करून नवीन ब्रँडिंग करण्यात आलंय,’ विल्सन यांनी धोरण स्पष्ट केलं. देशांतर्गत विमान सेवेतही महत्त्वाचे बदल एअर इंडिया करणार आहे.
कंपनीकडे असलेली जुनी ७३७ आणि ७८७ ही ड्रीमलायनर विमानं आता टप्प्या टप्प्याने बदलण्यात येतील. पण, त्याआधी जुन्या विमानांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यांची अंतर्गत रचनाही बदलण्यात येणार आहे. आणि कंपनी त्यावर ४० कोटी अमेरिकन डॉलरचा खर्च करणार आहे. ही सगळी कामं कंपनीतर्फे धडाक्यात सुरू आहेत. आणि डिसेंबर २०२३ पर्यंत एअर इंडियाची बदललेली सेवा आणि सुविधा प्रवाशांना अनुभवायला मिळेल, असं अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community