बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १०० पेक्षा अधिक वेळा महापालिका रुग्णालयांना भेटी दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, अतिरिक्त आयुक्त यांनी शंभरवेळा सर्व रुग्णालयांना भेटी दिल्यानंतरही प्रत्यक्षात सर्व रुग्णालयांना भेटी देत असले तरी सर्व रुग्णालयांच्या कार्यपध्दतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे रुग्णालयांमधील सेवांसह कर्मचाऱ्यांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारे बदल न झाल्याने नाबाद शतकी भेटी देवून नक्की काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णसेवा, वैद्यकीय क्षेत्र यांची विशेष आवड असलेले डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) या पदाचा कार्यभार ५ जून २०२३ रोजी स्वीकारला. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या आत त्यांनी महानगरपालिकेची विविध रुग्णालये मिळून तब्बल १०० हून अधिक भेटी दिल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, आरोग्य सेवेचे अधिकाधिक बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्या काय अपेक्षा व गरजा आहेत, याचा प्रत्यक्ष संवादातून डॉ. शिंदे हे नियमित आढावा घेत असून त्यानुसार कार्यवाहीला वेग देण्यात येत आहे.
(हेही वाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आशा भोसले यांना ‘She-Shakti’ पुरस्कार)
महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार, सर्वच रूग्णालयांमध्ये स्वच्छता मोहीम वेगाने सुरु आहे. महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये अधिकाधिक स्वच्छता राखतानाच, रूग्णांसाठी तसेच नातेवाईकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वातावरण असावे, हा यामागचा उद्देश आहे. रुग्णसेवेच्या बळकटीकरणासोबतच, रुग्णालयांमधील स्वच्छतेला प्राधान्य देत विशेष मोहीम देखील त्यांच्या निर्देशानुसार सध्या सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेची एकूण पाच वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम), बा.य.ल. नायर सर्वोपचार रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय यांचा समावेश होतो. या वैद्यकीय संस्थांमधील एकूण रुग्णशय्यांची संख्या ही सुमारे १२ हजार ४६२ इतकी आहे.
त्याचप्रमाणे, एकूण १७ उपनगरीय रुग्णालये कार्यरत आहेत. या १६ रुग्णालयांमध्ये सुमारे ३ हजार २४५ रुग्णखाटा आहेत. याशिवाय, समर्पित पाच विशेष रूग्णालये कार्यरत आहेत. कस्तुरबा रुग्णालय, ऍक्वर्थ कृष्ठरोग रूग्णालय, मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय; क्षयरोग रूग्णालय शेठ आत्मसिंग जेसासिंग बांकेबिहारी कान, नाक व घसा रूग्णालय यांचा समावेश आहे. महानगरपालिकेची ही सर्व रुग्णालये अव्याहतपणे रुग्णसेवा पुरवत असतात. त्यामध्ये प्राथमिक उपचारांपासून ते विशेषज्ज्ञांच्या सेवा, अतिविशेष उपचार सेवा यांचादेखील समावेश आहे.