राज्यातील महाविकास आघाडी सरकार आज कोसळणार, उद्या कोसळणार असे भाजपकडून वारंवार सांगितले जात असताना आता ठाकरे सरकार कोसळण्याचा तो दिवस खरच जवळ आला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र यावेळी त्याचे कारणही तसेच आहे आणि संकेत देखील तसेच मिळत आहेत. ज्या शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची मुहुर्तमेढ रोवली ते शरद पवार खुद्द राजकारणातील चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिल्याने राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी तर आता अमित शहांची ही नवी खेळी नाही ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
पवार-शहा भेटीमागे दडलंय का?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्तभेट झाल्याचे वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीनंतर येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत ही गुप्त भेट पाहता ही भेट साधीसुधी नसून, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राज्यात भूकंप घडवण्यासाठी ही भेट तर नाही ना, अशी चर्चा देखील रंगत आहे. राज्यात सचिन वाझेमुळे आधीच ठाकरे सरकार अस्वस्थ आहे. त्यातच माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुख हे अचडणीत आले आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत आहे. त्याचमुळे आता पवार हा दुसरा पर्याय निवडणार का? अशी चर्चा रंगत आहे. एवढेच नाही तर ज्या प्रफुल्ल पटेल यांचा सुरुवातीपासूनच भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता ते प्रफुल्ल पटेल देखील या भेटीत असल्याने ही शक्यता अधिक बळावली आहे.
(हेही वाचाः हे तर अॅक्सिडेंटल ‘होम मिनिस्टर’! देशमुखांबद्दल राऊतांचे ‘रोखठोक’ मत…)
अमहमदाबादमध्ये काय शिजलं?
दिव्य भास्करच्या बातमीनुसार, पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खाजगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते अहमदाबादला पोहोचले. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरुन हे नेते थेट शांती आश्रम येथील एका गेस्ट हाऊसवर गेले. त्याठिकाणी अमित शाह हे काही मोजक्या भाजप नेत्यांबरोबर आधीच हजर होते. बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. पण त्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली, ते मात्र कळू शकलेले नाही. त्यामुळे राज्यातील गेल्या काही दिवसांत बदलत असणा-या घडामोडींमध्ये आता एक वेगळंच वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहांच्या विधानाने वाढले गूढ
या भेटीमुळे चर्चांना उधाण आले असतानाच आता अमित शहा यांच्या एका विधानामुळे या चर्चांना एक वेगळेच वळण आले आहे. दिल्ली येथे अमित शहा यांना पत्रकारांनी या भेटीमध्ये काय चर्चा झाली असे विचारले असता, सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सार्वजनिक करता येत नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे या भेटीमागचे गूढ अधिक वाढले आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांच्यात अशी कुठलीही भेट झाली नसून, ही एक अफवा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे. तसेच गुजराती वृत्तपत्रांतून भाजपने अशा बातम्या पेरल्या आहेत, असेही मलिक म्हणाले.
Join Our WhatsApp Community