राज्यातील रुग्णालयांमध्ये बंधपत्रित सेवा डॉक्टरांची संख्या वाढवण्याच्या सरकारी अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने एमडी, एमएस डॉक्टरांच्या डोक्यावर टांगलेली तीन महिन्यांची बेरोजगारीची कुऱ्हाड अखेरीस वैद्यकीय शिक्षण खात्याने बाजूला सारली. बंधपत्रित डॉक्टरांची पदे कमी आणि जास्त उमेदवार असल्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय शिक्षण विभाग सरकारी अध्यादेशाचे पालन करत नसल्याने मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेरीस शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही पदे भरण्याची प्रक्रिया शनिवार, १२ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
(हेही वाचा – Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका)
मार्ड संघटनेची मागणी –
राज्यातील रुग्णालयांमध्ये बंधपत्रित सेवा डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० होती. ही कमी पडत असल्याने डॉक्टरांकडून पदसंख्या वाढविण्याच्या मागणीचा विचार करुन सरकारने ती पदे अतिरिक्त १ हजार ४३२ एवढी करुन घेतली. अतिरिक्त जागा १ हजार ४३२ तसेच पूर्वीच्या १ हजार ६०० जागा अशा मिळून ३ हजार ३२ जागांवर उमेदवार त्वरीत काम करु शकतील अन्यथा एमडी, एमएस सारख्या डॉक्टरांना तीन महिने बेरोजगारी सहन करावी लागणार होती.
सरकारने जानेवारी महिन्यात काढलेल्या सरकारी अध्यादेशाची अंबलबजावणी करावी, १ हजार ४३२ पदांची त्वरीत भरती करावी अशी मागणी मार्ड डॉक्टरांनी केली आहे. यामुळे अतिरिक्त जागा १४३२ तसेच पूर्वीच्या १६०० जागा अशा मिळून ३०३२ जागांवर उमेदवार त्वरीत काम करु शकतील असा मुद्दा मार्डच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत मांडला गेला.
नवीन १ हजार ४३२ पदे शुक्रवारी रात्रीपर्यंत जोडण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता जागा भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे असे आश्वासन मिळताच आक्रमक पवित्रा घेतलेल्या डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय पाठी घेतला. अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले असते तर शुक्रवारी आम्ही आंदोलन जाहीर करण्याच्या तयारीत होतो, असे मार्डचे सदस्य म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community