- ऋजुता लुकतुके
ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी सिंधूला कठीण ड्रॉ मिळाला आहे. पहिल्या फेरीतील तिच्यासह दुहेरीतील जोडी साईसात्विक आणि चिराग यांनाही बाय मिळालाय. बॅडमिंटनमध्ये आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते महिना अखेरीस होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेकडे. या स्पर्धेसाठीचा ड्रॉ शुक्रवारी (११ ऑगस्ट) मलेशियात कौलालंपूर इथं काढण्यात आला. आणि यात २०१९ मधील विजेती आणि भारताची सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पहिल्या फेरीत पुढेचाल मिळाली आहे. तिच्या प्रमाणेच पुरुषांच्या दुहेरीतील भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनाही पहिल्या फेरीत पुढेचाल मिळाली आहे. ही जोडी स्पर्धेत द्वितीय मानांकित आहे.
सिंधूला थेट दुसरी फेरी खेळायची असली तरी तिचा ड्रॉ कठीण आहे. कारण, ती थायलंडची रॅचनन इथेनॉक आणि कोरियाची आन से यंग यांच्या बरोबर एकाच ड्रॉमध्ये आहे. या दोघींविरुद्ध यावर्षी सिधू एकदाही जिंकू शकलेली नाही. सिंधूने यापूर्वी २०१९ मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आणि ही कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय आहे. शिवाय तिच्या खात्यात दोन रौप्य पदकं आणि दोन कांस्य पदकंही जमा आहेत. पण, यंदा तिचा फॉर्म तितकासा चांगला नाही. क्रमवारीतील स्थान जेमतेम टिकवत ती स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पुरुषांमध्ये भारताचं मुख्य आव्हान असेल ते एच एस प्रणॉय. स्पर्धेत त्याला द्वितीय मानांकनही मिळालं आहे. त्याच्या शिवाय लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांतही एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करतील.
(हेही वाचा – Conjunctivitis : यंदाच्या वर्षांत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ डोळ्यांचे रुग्ण)
महिला दुहेरीत भारताच्या दोन जोड्या खेळतील. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनाही पहिल्या फेरीत पुढेचाल मिळाली आहे. तर भारताची दुसरी महिला जोडी असेल अश्विनी भट आणि शिखा गौतम. मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि एन सिक्की रेड्डी तसंच वेंकट प्रसाद तसंच जुही देवांगन ही जोडीही खेळणार आहे. बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धा २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान डेन्मार्क इथं कोपनहेगन इथं होणार आहे. ऑलिम्पिक नंतरच्या दुसऱ्या मानाच्या या स्पर्धेत आतापर्यंत भारताने १३ पदकं जिंकली आहेत. यात सिंधूने १ सुवर्णसह दोन रौप्य आणि २ कांस्य पदकं जिंकली आहेत. तर सायनालाही एक रौप्य आणि १ कांस्य पदक मिळालं आहे. याशिवाय किदंबी श्रीकांतनेही २०२१ मध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. शिवाय साई प्रणित आणि लक्ष्य सेनं एकेकदा कांस्य जिंकलं आहे. अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टाच्या जोडीनेही एक कांस्य पदक जिंकलं आहे. स्पर्धेत ताजं यश मिळवणारी जोडी आहे ती पुरुष दुहेरीतील साईसात्विक आणि चिराग. गेल्यावर्षी दोघांना कांस्य पदक होतं. आणि यंदा चांगल्या फॉर्मनंतर दोघांनी जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे दोघांकडून यंदाही भारताला अपेक्षा आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community