अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे, दहशतही आहे अशी टीका रोखठोकमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांच्या या मताबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. कोणत्याही नेत्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
काय म्हणाले अजित दादा?
हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री करायचे हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. तिन्ही पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचाः मुख्यमंत्री संजय राऊतांना समज देणार?)
काय म्हणाले होते संजय राऊत?
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे, दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरुन कसे चालेल, असा टोलाही राऊतांनी अनिल देशमुख यांना लगावला होता.
Join Our WhatsApp Community