Psychiatrists : मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांचीही तेवढीच जबाबदारी – मानसोपचार तज्ज्ञांचे मत

169

शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांचीही तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. मुलांच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणं ही अतिशय गरजेची बाब आहे,असे मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

शीव (सायन) परिसरातील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात ‘शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कोरोनंतरचे शिक्षण, लैंगिकता, किशोरावस्था आणि शालेय मानसिक आरोग्याच्या संबंधात पौगंडावस्थेतील बाबी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखील या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात राज्यभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी  महानगरपालिकेची सर्व रुग्णालये अविरतपणे कार्यरत आहेत. त्याबरोबरच विविध विषयांवर संशोधन व शैक्षणिक विचारमंथन देखील या महाविद्यालयात नियमितपणे होत असते. याच अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचारही महानगरपालिकेच्या मानसोपचार विभागाकडून केला जातो. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील शाळांमधील मुलांच्या मानसिक आरोग्यबाबत चर्चा व्हावी आणि यातून मुलांच्या मानसिक आरोग्यसाठी ठोस उपायोजना कारणासाठी शीव (सायन) येथील  महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात मुंबई मानसोपचार सोसायटी, भारतीय मानसोपचार सोसायटी आणि स्कूल मेंटल हेल्थ टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा MNS : सीमा हैदरवर चित्रपट काढणा-या निर्मात्याला मनसेचा इशारा)

या चर्चासत्राला राज्यभरातील शाळांमधून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील जवळपास ६०० पेक्षा अधिक शाळांनी या चर्चासत्रात सहभागी नोंदविला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना,शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांनी सतत नवीन काहातरी करत राहिले पाहिजे; ज्यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढेल. प्रगतीसाठी मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे, असे मत ‘भारतीय मानसोपचार सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. विनय कुमार यांनी व्यक्त केले.

यावेळी मुंबई मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ‌. अविनाश देसूसा, डॉ. केर्सी चावडा यांच्यासह तज्ञांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांचीही तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. मुलांच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणं ही अतिशय गरजेची बाब आहे. त्यामुळेच मुलांना रोजच्या रोज व्यायाम, पोहणे, शारीरिक खेळ,  बौद्धिक खेळ, वाचन, चित्र काढणे यासोबतच नवनवीन गोष्टी शिकणे फार महत्त्वाचे असते. यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत, असा देखील सूर चर्चासत्रामध्ये उमटला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.