- संजय दि. मुळ्ये, रत्नागिरी
भारताच्या एका प्रांतात म्हटले जाते की,
चहा बिघडला, त्याची सकाळ बिघडली ।
डाळ बिघडली, त्याचा दिवस बिघडला ।
लोणचे बिघडले, त्याचे वर्ष बिघडले !
हेसाधे व्यवहारज्ञान माहीत असणाऱ्या हिंदूंना याच धर्तीवर आज सांगावेसे वाटते की, एकवेळ चहा बिघडला तरी चालेल, आमटी चांगली नाही झाली तरी चालेल, लोणच्याचीही काही अन्य व्यवस्था करता येईल; पण ज्या देशाच्या स्वातंत्र्याची पहाट बिघडली, त्यामुळे थोडी थोडकी नव्हे, ७६ वर्षे बिघडली आहेत. १४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पाकिस्तानमुळे बिघडलेली ही वर्षे आता काही चांगली होऊन परत येणार नाहीत आणि पुढील किती वर्षे बिघडलेलीच रहाणार हेही कळत नाही! या संबंधात मठ्ठ हिंदूंच्या डोक्यात प्रकाश पडावा; म्हणून हा लेखप्रपंच!
काँग्रेसचा निलाजरेपणा!
भारताच्या स्वातंत्र्याची पहाट बिघडलेली होती ? कोण म्हणतो असे ? क्रिकेटमध्ये दंग असणार्या आजच्या पिढीला, फुटबॉलच्या खेळासाठी पहिले पान खर्च करणाऱ्या वृत्तपत्रसृष्टीला, भ्रष्टाचार करून आपल्या सात पिढ्यांचे कोटकल्याण (की नुकसान) करणाऱ्या अनेक पुढाऱ्यांना कदाचित आठवतही नसेल की, १४ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या पाकिस्तानने आमच्या १९४७ सालचा एकच नव्हे, तर दरवर्षीचेच १५ ऑगस्ट नासवले आहेत. वृद्ध झालेल्या व सत्तेसाठी हपापलेल्या काँग्रेसी नेत्यांनी निलाजरेपणाने भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी एक दिवस पाकिस्तानचे स्वातंत्र्य मान्य केले !
काय केले नाही या काळ्याकुट्ट दिवसाने?
हुकुमशहांच्या हातून मारली गेली नाहीत, एवढी माणसे काँग्रेसच्या फाळणीच्या निर्णयाने मारली गेली. सुमारे १० लाख हिंदू यामुळे मारले गेले आणि दीड कोटी निर्वासित झाले. कोणाला वाटेल, त्या वेळी हिंदूंच्या वाट्याला आलेले मरण तरी स्वस्त असेल; पण तोही कल्पनाविलासच ठरेल. हिंदू निर्वासितांनी खचाखच भरलेली एक आगगाडी दिल्लीला येण्यासाठी रावळपिंडी स्थानकावरून सुटली. स्थानकापासून थोड्याच अंतरावर मुसलमान धर्मांध खाटिक तिची वाटच पाहत होते. त्यांनी गाडी थांबवली. एकेक डबा उघडून त्यांनी पद्धतशीरपणे कत्तल आरंभली. आईच्या मांडीवरून मूल खेचतांना किंवा भावाला बिलगलेली बहीण ओढतांना त्यांना काहीच वाटले नाही. लहान मुलांच्या तंगड्या फासकटून त्यांना आपटतांना त्यांनी क्रौर्याचा परमावधी गाठला. तरुण मुलींना त्यांनी फरफटत बाहेर काढले. त्या पळून जाऊ नयेत म्हणून एकीचा उजवा व दुसरीचा डावा पाय एकत्र बांधण्यात आला. १५ ऑगस्टपर्यंत ज्या हिंदू स्त्रिया जबरदस्तीने पळवण्यात आल्या, त्यांची नंतर नग्न मिरवणूक काढण्यात आली. एकट्या लाहोरमध्ये ९०० स्त्रियांना नग्न करून भर रस्त्यांतून त्या नराधमांनी मिरवल्या. पाकिस्तानमधील मुलतान, रावळपिंडी, डेरा इस्माईल खान आदी शहरांतही कमी-जास्त प्रमाणात हेच घडले!
(हेही वाचा INS Vindhyagiri : ‘आयएनएस विंध्यगिरी’चे 17 ऑगस्ट 2023 रोजी होणार राष्ट्रार्पण)
फाळणीच्या ठरावानंतरही सात वर्षे गाफील असणारे बहुतांश हिंदू!
२५ मार्च १९४० रोजी लाहोर येथे जीनांच्या मुस्लिम लीगने फाळणीचा ठराव केला आणि केवळ सातच वर्षांत असंख्य क्रांतीकारकांचे बलीदान तुच्छ ठरवून काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. तत्पूर्वी हजार वर्षे या ना त्या प्रकारे हिंदुस्थानावर परकीय आक्रमणे होत होती. या प्रदीर्घ काळातही हिंदूंनी परकीय सत्तेला कधीच संमती दिली नव्हती; पण १९४७ साली विपरित घडले.
सांस्कृतिक आणि धार्मिक नुकसान!
भारताने १४ ऑगस्ट रोजी गमावलेल्या भूभागाशी आमचे सांस्कृतिक आणि धार्मिक नाते आहे. जिच्या काठी आमची संस्कृती फुलली, जिच्या काठी आमच्या ऋषीमुनींनी वेदऋचा म्हटल्या, ती सिंधू फाळणीमुळे आम्हाला परकी झाली. ज्या नदीचा उद्घोष आमच्या धर्मविधीत होत असतो, त्या गंगेचा एकपंचमांश भाग पूर्व पाकिस्तानात गेला. तिला येऊन मिळणारी ब्रह्मपुत्राही बांगलादेशातून वाहावे लागल्यामुळे दु:खी आहे. देववाणी संस्कृतचे व्याकरण लिहिणाऱ्या पाणिनीचे जन्मस्थान, शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थान – नानकाना साहब – पाकिस्तानात गेले. प्रभु श्रीरामचंद्रांचा पुत्र लव याने वसवलेले लाहोर, ढाकेश्वरीदेवीच्या नावाने वसवलेले ढाका हे सर्व पाकिस्तानात (सध्याचा बांगलादेश) गेले. इतके सर्व मिळूनही पाकड्यांचा दुरात्मा शांत झाला नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमधील जवळजवळ सर्व मंदिरे व गुरुद्वारा त्यांनी गेल्या ७५ वर्षांत नष्ट केली. काही मंदिरांतील मूर्ती फोडल्या, काही ठिकाणी लघुशंका केल्या, विष्ठा टाकल्या, गायी कापल्या किंवा गोमांस विक्रीची दुकाने उघडली. तथाकथित बाबरीच्या पतनानंतर तर पाकिस्तान व बांगलादेशात ‘क्रेन’ लावून तेथील सरकारांनीच मंदिरे पाडायला हातभार लावला.
पाकिस्तान झाले म्हणजे नेमके काय झाले?
अस्तित्वात आल्यानंतर केवळ १० आठवड्यांतच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. फाळणीच्या आधी वर्षभरात झालेले नुकसान, स्त्रियांची विटंबना या सर्वांचा हिशोब चुकता करण्याची आयती संधी पंडित नेहरूंना चालून आली होती. सैन्याचेही हात शिवशिवत होते; पण नेहरूंना पाकचा पुळका आला. काश्मीरचा एकतृतीयांश भाग पाकिस्तानच्या आणि उर्वरित भाग शेख अब्दुल्लाच्या घशात घालून भारताच्या उशाशी कायम फुसफुसत रहाणारा हा सर्प नेहरूंनी जिवंत ठेवला! पाकिस्तान झाले म्हणजे नेमके काय झाले, हे सावरकर-गोळवलकर यांसारखे हाताच्या बोटांवर मोजता येणारे नेते सोडले, तर भल्याभल्यांनाही कळले नाही.
१४ ऑगस्टच्या स्मरणाचे प्रयोजन!
अमेरिकन जनता ११ सप्टेंबरची घटना विसरलेली नाही. मिळेल ते निमित्त पुढे करून त्यांनी कधी अफगाणिस्तान, तर कधी इराकवर चढाई करून त्या देशांना उजाड केले. ११ सप्टेंबरचा बदला त्यांनी कैक पटीने घेतला आहे. हिंदुस्थानला मात्र आपल्यावरील असे कैक हल्ले विसरायची सवय लागली आहे. अयोध्या, दिल्ली, बंगळुर, वाराणसी येथे बाँबस्फोट झाल्याचे दिनांक किती हिंदूंच्या लक्षात आहेत?
भारतीय शहरांतील बाँबस्फोटांचे दिनांक लक्षात ठेवायची कटकट कायमची मिटवायची असेल आणि अन्य शहरांची नावे त्यात अधिक व्हायला नको असतील, तर आपल्याच हातांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान जन्माला घालायची केलेली चूक हिंदूंनी लवकरात लवकर दुरुस्त केली पाहिजे ! या १५ ऑगस्टचेही हेच मागणे आहे!!
(लेखक वीर सावरकर साहित्याचे अभ्यासक आहेत.)
Join Our WhatsApp Community