Indian Hockey Team : आशियाई चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपदाबरोबरच भारतीय संघ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर

मलेशिया संघाचा ४-३ असा पराभव करत भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडकावर कोरलं नाव

160
Hockey India : हॉकीतही आता क्रिकेटसारखे मध्यवर्ती करार?
Hockey India : हॉकीतही आता क्रिकेटसारखे मध्यवर्ती करार?
  • ऋजुता लुकतुके

शनिवारी आशियाई करंडक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघाने आता जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकानंतर दुसऱ्यांदा भारतीय संघ पहिल्या तीनात पोहोचला आहे. भारतीय संघाने शनिवारी (१२ ऑगस्ट) रोजी घरच्या मैदानावर मलेशिया संघाचा ४-३ असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरलं. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. आणि अंतिम सामन्यात तर ०-२ असा पिछाडीवरून भारताने सामना आणि करंडक आपल्याकडे खेचून आणला. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अधिकृत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

महिन्याच्या शेवटी होणाऱ्या आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारतीय संघाला नवीन ऊर्जा देणारीच ठरेल. ही वाटचाल करताना भारताने यापूर्वी तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या (२७६३.५०) संघाला मागे टाकलं आहे. नेदरलँड्सचा संघ ३०९५.९० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहेत. तर त्यांच्या खालोखाल बेल्जिअम संघाचे २९१७.८७ गुण आहेत. हे दोन्ही संघ सध्याच्या घडीला भारतापेक्षा सरस आहेत.

भारतीय संघाने यापूर्वी २०२१ मध्ये पहिल्या तीनात स्थान मिळवलं होतं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यावर ही किमया संघाने केली होती. आणि आता संघाला हात दिला आहे तो आशियाई करंडक स्पर्धेतील कामगिरीने. या स्पर्धेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवताना पेनल्टी कॉर्नर तसंच मैदानी खेळातही चमक दाखवून दिली. अंतिम सामन्यात तर मध्यंतराला भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर पडला होता. पण, पुढच्या दोन क्वार्टर्समध्ये जोरदार खेळ करत भारतीय संघाने मलेशियाचा पराभव केला.

(हेही वाचा – IND vs WI T20I : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा धुव्वा, विंडिजने जिंकली मालिका)

भारतीय संघाचं विक्रमी चौथं विजेतेपद – 

शनिवारच्या अंतिम सामन्यात मलेशियाविरुद्ध दहाव्या मिनिटाला भारताने आघाडी घेतली होती. हरमनप्रीत सिंगने हा गोल केला. पण, त्यानंतर मलेशियन आक्रमणाला भारतीय खेळाडूंनी काही सोप्या संधीही दिल्या. आणि त्यांचा फायदा उचलत मलेशियाने १४व्या, १८व्या आणि २८व्या मिनिटाला गोल करत मध्यंतराला चक्क ३-१ अशी आघाडी मिळवली.

पण, हरमनप्रीत सिंगचा हा संघ यावेळी काही वेगळ्याच मूडमध्ये होता. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने अथक प्रयत्न केले. पण, संधी चालून आली आणखी पंधरा मिनिटांनी सुखजीतला चुकीच्या पद्धतीने अडवल्याबद्दल रेफरींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. आणि पुन्हा एकदा हरमनप्रीतने गोल केला. काही सेकंदातच भारतीय संघाने बरोबरीही साधली. गुरजंत सिंगने शेवटच्या क्षणी हरमनप्रीतच्या पासला गोलजाळ्याची दिशा दाखवली.

आणि सामना संपायला ४ मिनिटं बाकी असताना आकाशदीपने गोल करत संघाला विजयीही केलं. भारतीय संघाने मलेशियाचा चौथ्यांदा पराभव केला होता. आणि हा करंडकही चौथ्यांदा जिंकला. याआधी झालेल्या २०२१च्या स्पर्घेत भारतीय संघाला तिसरा क्रमांक मिळाला होता. यानंतर सप्टेंबर महिन्यात आशियाई स्पर्धा होणार आहेत. तिथेही हेच प्रतिस्पर्धी संघ असल्यामुळे भारतीय हॉकी संघाची ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.