- ऋजुता लुकतुके
विंडिज विरुद्धची टी-२० मालिका २-३ अशी गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने एक मोठं विधान केलं आहे. अर्थात, पराभवासाठी कारणं देणं त्याने टाळलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा पाचवा सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर बोलताना पराभवासाठी कारणं दिली नाही. पण, त्याचवेळी एक मोठं विधानही केलं. ‘काही वेळा पराभव चांगले असतात,’ असं तो म्हणाला. पराभवामुळे चुकांची कल्पना येते असं त्याला म्हणायचं होतं.
विंडिज संघाने पाचव्या टी-२० सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी असा दोन्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवलं. भारतीय फलंदाजांचं अपयश आणखी उठून दिसलं. कारण, त्याच खेळपट्टीवर नंतर विंडिज फलंदाजांनी षटकारांची आतषबाजी केली. ‘दहाव्या षटकात आम्ही सामन्यातील वर्चस्व गमावलं. तेव्हा मी फलंदाजीला आलो होतो. आणि माझ्याकडून अपेक्षा होती जम बसवण्याची तसंच धावा वाढवण्याची. पण, लांबचा विचार केला तर ठिकच झालं. आम्हाला आमच्या चुका कळल्या आहेत. आणि त्या सुधारायला आमच्याकडे वेळही आहे. आम्ही फार निराश होण्याचं कारण नाही. आणि आम्हाला कुणाला उत्तरही देण्याची गरज नाही,’ असं हार्दिक सामन्यानंतर बोलताना म्हणाला.
(हेही वाचा – FIDE Chess World Cup : गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन हे तिघे भारतीय बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत)
उलट भारतीय युवा खेळाडूंनी आव्हान स्वीकारलं आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची तयारी दाखवली, याचं समाधान हार्दिकला वाटतं. त्याने तसं बोलूनही दाखवलं. आणि प्रत्येक युवा खेळाडूंनी आपलं कौशल्य जगाला दाखवून दिलं, असं हार्दिक म्हणाला. अमेरिकेत फ्लोरिडा इथं झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात विंडिज संघाने भारताचा ८ गडी राखून आरामात पराभव केला. ब्रँडन किंगच्या ८५ धावा आणि निकोलस पुरनने केलेल्या ४७ धावांच्या जोरावर त्यांनी अठराव्या षटकातच भारताची १६५ ही धावसंख्या पार केली. एकाही भारतीय फिरकीपटूला चांगली कामगिरी करता आली नाही.
तर त्यापूर्वी भारतीय फलंदाजी मात्र ढेपाळली. सूर्यकुमार यादवने केलेल्या ६१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने निदान १६० धावांचा टप्पा ओलांडला. त्याला तिलक वर्माने २७ धावा करून थोडीफार साथ दिली. कर्णधार हार्दिक पांड्याने पुढील वर्षी होणाऱ्या नियोजित टी-२० स्पर्धेची आठवण करून दिली. हा विश्वचषक सामना वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणार आहे. अशावेळी आताचा अमेरिकेत खेळण्याचा अनुभव भारतासाठी महत्त्वाचा असेल. आणि भारतीय खेळाडू तेव्हा मोठी कामगिरी करतील, असं हार्दिकला वाटतं. भारतीय संघ आता आयर्लंडबरोबर तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमरा भारतीय संघाचं नेतृत्व करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community