मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया चाचणी करणाऱ्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना गुरुवारी घडली. कल्याण येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र आरोप फेटाळून लावले.
नेमकी घटना काय?
विक्रोळी येथील रहिवासी असलेल्या पूजा लोखंडेच्या लग्नाला कित्येक वर्ष उलटूनही तिला मूल होत नव्हते. मूल होण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार सुरु करावेत यासाठी पूजा कल्याण येथे आपल्या आई-वडिलांच्या घरी आली. गुरुवारी पूजा कल्याण येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली. तिच्यावर हिस्ट्रोलेप्रोस्कोपी चाचणी करण्यात आली. हिस्ट्रोलेप्रोस्कोपीची चाचणी सुरु असतानाच पूजाची तब्येत बिघडू लागली. काही तासातच पूजाचा मृत्यू झाला.
पूजाच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पूजाच्या नातेवाईकांची समजूत काढली. पूजाचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी कल्याण डोंबिवली वैद्यकीय रुग्णालयात पाठवला गेला. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी ताब्यात घेतला. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून रुग्णालयीन कारवाईबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन पूजाच्या नातेवाईकांना दिले.
रुग्णालयाचे स्पष्टीकरण
पूजाचा मृत्यू वैद्यकीय दुर्लक्षितेमुळे झाल्याचच्या आरोपावर डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली. हे आरोप खोटे असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पूजाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही रुग्णालयातील डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community