यावर्षी महापालिका निवडणूका लागतील असं वातावरण दिसत नाही. राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील. आम्ही प्रत्येक मतदारसंघनिहाय टीम पाठवू आणि आढावा घेतला जाईल. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यादृष्टीने आजची बैठक होती. पनवेलला माझा मेळावा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडलेत त्यावर मी बोलणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. याच बैठकीत राज ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. भाजपाकडून युतीची ऑफर मिळाली आहे पण अद्याप आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. मनसेच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यात लोकसभा निहाय मतदारसंघात मनसेची टीम जाणार, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार त्यानंतर पुढील कार्यक्रम हाती घेणार असल्याचे बैठकीत ठरले. मनसे- भाजपा -शिंदे गटासोबत युतीत जाणार अशी चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. त्यावरही राज ठाकरेंनी यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले. भाजपाकडून आपल्याला ऑफर आहे परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार यांचे भाजपा काय करणार, पुढचे गणित कसे जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला)
Join Our WhatsApp Community