ESIC Hospital : अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालयात नवीन ओपीडी सेवा सुरू

144

मुंबईतल्या अंधेरी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) रुग्णालयात सोमवारी खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते नवीन ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सेवेचे उद्घाटन करण्यात आले. बोरिवली येथील ईपीएफओ कर्मचारी निवासाची पायाभरणीही त्यांनी केली. यावेळी ईएसआयसीचे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार उपस्थित होते.

अंधेरी येथील ईएसआयसी रूग्णालयातील ओपीडी सेवा महाराष्ट्र राज्यातील ईएसआयसीच्या वैद्यकीय पायाभूत सुविधेत वाढ करेल आणि ती अधिक बळकट करेल. यामुळे  विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण होतील. यापूर्वी 2018 मध्ये अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय तात्पुरते कांदिवली येथे हलविण्यात आले होते. अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालय अद्ययावत करणे  आणि त्याचा विस्तार यासंदर्भातले काम जवळजवळ पूर्ण झाले असून रुग्णांना दाखल करून घेण्यासाठीची अंतर्गत वैद्यकीय सेवादेखील लवकरच पुन्हा सुरू होईल. सुरू केल्या जात असलेल्या ओपीडी सेवेत सामान्य औषध, अस्थिव्यंग, मूत्रविकारशास्त्र, हृदयचिकित्सा, ईएनटी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (जठर व आतड्याचे विकार), त्वचाविज्ञान इत्यादीचा समावेश आहे. ओपीडी सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई परिसरातील सुमारे 25 लाख ईएसआय लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. हे रुग्णालय अद्ययावत करण्याचा प्रकल्प खर्च 260 कोटी रुपये इतका आहे. बोरिवली येथे पायाभरणी करण्यात आलेले ईपीएफओ कर्मचारी निवास संकुल सुमारे 7440.90 चौरस मीटर जागेवर बांधले जाईल. यासाठी  प्रकल्प खर्च सुमारे 566 कोटी रुपये आहे. हा गृहनिर्माण प्रकल्प ईपीएफओच्या सुमारे 1900 कर्मचाऱ्यांच्या निवासी गरजा पूर्ण करेल.

(हेही वाचा I.N.D.I.A च्या महाराष्ट्रातील बैठकीआधीच ठाकरे गटाने टाकला मिठाचा खडा; भलताच प्रस्ताव मांडून नव्या वादाला सुरुवात)

महाराष्ट्रात ईएसआय योजना

राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये ईएसआय योजना लागू आहे. ईएसआय योजनेचे पर्यवेक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई आणि 6 उपप्रादेशिक कार्यालयांद्वारे केले जाते. राज्यातल्या 2.35 लाख युनिट्समध्ये कार्यरत सुमारे 40 लाख विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 1.5 कोटी व्यक्तींच्या  वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याचे कार्य याद्वारे सुरू असते. महाराष्ट्र राज्यात 14 डीसीबीओ (दवाखाना व शाखा कार्यालय) सह 82  ईएसआयसी  शाखा कार्यालये आहेत. राज्यात एकूण 15 ईएसआय रुग्णालये (3 ईएसआयसी रुग्णालये आणि 12 ईएसआयएस रुग्णालये) आहेत. महाराष्ट्रात 92 दवाखाने ( ईएसआयसी – 14 डीसीबीओ,  ईएसआयसी – 82 दवाखाने) आणि 598 विमाविषयक  डॉक्टर आहेत.  महाराष्ट्रात  दुय्यम वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी 175 रुग्णालये आणि सुपर स्पेशालिटी उपचार प्रदान करण्यासाठी 139 रुग्णालये पॅनेलमध्ये सूचीबद्ध  करण्यात आली आहेत.

भारतातील ईएसआय योजना

ईएसआयसी ही अग्रणी  सामाजिक सुरक्षा संस्था असून ती किफायतशीर  वैद्यकीय सेवा पुरवते आणि काम करताना होणाऱ्या दुखापती, आजार, मृत्यू इत्यादीसारख्या गरजेच्या वेळी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करते. ती सुमारे 3.42 कोटी कामगारांच्या कुटुंबांना सुरक्षा प्रदान करते. देशभरातील 611 जिल्ह्यांतील 13 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना रोख लाभ आणि किफायतशीर  वैद्यकीय सेवा या माध्यमातून उपलब्ध होत आहे.  ईएसआयसीच्या  पायाभूत सुविधेत आज, 1574 दवाखाने, 161 ईएसआय रुग्णालये, 8 वैद्यकीय महाविद्यालये, 2 दंत महाविद्यालये, 2 नर्सिंग महाविद्यालये, 604 शाखा कार्यालये, 96 डीसीबीओ आणि 64 प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक कार्यालयांसह अनेक पटीने वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.