- ऋजुता लुकतुके
पारंपरिक कला आणि कसब असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. त्यासाठी १३,००० ते १५,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७७व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशातील कुशल कामगार, महिलांचे बचत गट तसंच शहरी गरीब लोकांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. यातलीच एक आहे विश्वकर्मा योजना. न्हावी, सोनार, परीट अशासारख्या छोटेखानी कामं करणाऱ्या लोकांसाठी ही योजना असेल. सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. विश्वकर्मा जयंती १७ सप्टेंबर २०२३ ला आहे. या योजनेसाठी सरकारने १३,००० ते १५,००० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
देशातील छोटे, गुणी कलाकारांना त्यांची कलाकृती देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोवण्यासाठी ही योजना मदत करेल. अशा कामांची गुणवत्ता, प्रमाण आणि त्यांची बाजारपेठ विस्तारण्यासाठी या योजनेद्वारे प्रयत्न केले जातील. त्यातून अशा छोट्या कलाकारांचं आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, आणि इतर मागासवर्गीय तसंच महिला आणि ट्रान्सजेंडर यांना प्राधान्यही देण्यात येईल. कृषि क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढावा यासाठी महिलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रमही सरकारने या अंतर्गत हाती घेण्याचं ठरवलंय.
(हेही वाचा – Chandrayaan-3 : यान चंद्राच्या शेवटच्या कक्षेत दाखल)
तर महानगरातील गरीब घटकांसाठी घरकूल योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत समाजातील गरीब घटकांना हक्काचं घर मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. ‘शहरात जे कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्टीत किंवा अनधिकृत ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी गृहकर्जात सवलत देणारी योजना सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. २-३ वर्षांत तशी योजना अंमलात येईल. अशा लोकांना गृहकर्जावरील व्याजदरात सूट मिळेल,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान म्हणाले.
यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही महानगरांसाठीच असलेली योजना सध्या अस्तित्वात आहे. पण, तिची मुदत येत्या डिसेंबर महिन्यात संपतेय. त्यामुळे या योजनेच्या जागी नवीन योजना येईल किंवा जुन्या योजनेला मुदतवाढ देताना काही बदल होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या या योजनांचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला आहे. लवकरच याची सरकारी रुपरेषा स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. विश्वकर्मा योजना पुढच्याच महिन्यात सुरू होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community