– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
बॉलिवूडचे अनेक चित्रपट फ्लॉप होत असताना Gadar 2 ने मोठीच बाजी मारलेली आहे. चित्रपटगृह टाळ्या, शिट्ट्या आणि भारत माता की जय या घोषणेने दुमदुमले आहे. 2001 रोजी लगान या चित्रपटाबरोबर गदर एक प्रेमकथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले. पण गदरला लोकांनी डोक्यावर घेतलं. 18 कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटींचा गल्ला जमवला. आता जवळजवळ 22 वर्षांनी गदर 2 प्रदर्शित झाला आहे.
दोन्ही चित्रपट मी चित्रपटगृहात पाहिले आहेत. Gadar 1 चित्रपटाच्या वेळी मी 16 वर्षांचा होतो. आता माझं वय 38 वर्ष आहे. आता चित्रपटगृहात 16 वर्षांच्या पोरांचा आणि माझ्यासारख्या 38 वर्षीय प्रौढांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आपल्या भारतात भाईचारा, गंगा जमुना तेहजीब हे शब्द खूप उच्चारले जातात. काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी भाईचारा राखण्यासाठी स्वतःचे अस्तित्व असलेले हिंदुत्व गुंडाळून ठेवले आणि आपण हिंदी आहोत असं सांगायला सुरुवात केली.
अर्थात आपण सगळे भारतीय बांधवच आहेत. मात्र भाईचारा प्रस्थापित करण्याची काँग्रेसची पद्धत अत्यंत चुकीची होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाईचारा कशा प्रकारे निर्माण होऊ शकतो, हे सांगितलेलं आहे. आपला लहान भाऊ चुकत असेल तर त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष न करता, कधी ना कधी तो सुधारेल, अशी भाबडी आशा न धरता त्याला चुका करू न देता त्याचे कान धरून काय चांगले आणि काय वाईट हे समजावून सांगितले पाहिजे. आई नाही का मुलांना रट्टे लावत? पण त्याने आईची माया काय कमी होते?
(हेही वाचा Crime : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या मुंबईतील दोन तरुणांना अटक)
Gadar सारख्या चित्रपटांमुळे हा विचार बळावतो. चित्रपटांमुळे निश्चितच समाज मनावर परिणाम होतो, म्हणूनच वीर सावरकरांनी नाट्यलेखन केले. गदर सारख्या चित्रपटांमुळे देशभक्तीची भावना अधिक बळकट होते आणि पाकिस्तानशी व भारतात असणाऱ्या पाकिस्तानी प्रवृत्तीशी कसं वागायचं याची एक झलक तारा सिंह आपल्याला दाखवतो.
सनी देओलने साकारलेला तारा सिंह म्हणजे हिंदू समाजाचं प्रतीक आहे. पाकिस्तानचा मोठा ऑफिसर तारा सिंहला हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणायला सांगतो, तेव्हा तो म्हणतो की, माझ्या बोलण्याने काय होणार आहे? हिंदुस्थान जिंदाबाद होता, तो जिंदाबादच राहणार आहे. हीच भावना भारतातील प्रत्येक धर्माच्या व्यक्तीची असायला हवी. वंदे मातरम् हा आपला राष्ट्रीय मंत्र आहे. तो प्रत्येकाच्या मुखी असायलाच हवा. हीच भावना तारा सिंह त्याच्या राकट शैलीत व्यक्त करतो.
गदिमा किती सुंदर लिहितात,
वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥
माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती ।
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती ।
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम् ॥
Join Our WhatsApp Community