Sudhir Mungantiwar : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याच्यांचे करा सेवन – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर येथील कृषी भवन जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयाेजन

145
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याच्यांचे करा सेवन - सुधीर मुनगंटीवार
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याच्यांचे करा सेवन - सुधीर मुनगंटीवार

बदलत्या आहाराचा प्रमुख पर्याय म्हणून रानभाज्यांकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक पोषणमूल्ये रानभाजीतून मिळत असते असे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार( Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून या वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता केवळ कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रातच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. मत्स्यव्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मिशन जयकिसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी. कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहावा असेही  मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) म्हणाले.
चंद्रपूर येथील कृषी भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते, वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, रानभाज्यांचे आहारातील महत्व पटवून देण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खाद्यपदार्थांच्या परंपरा आहेत. मात्र, हळूहळू पिझ्झा, बर्गर व इतर गोष्टींमुळे ह्या पंरपरा लुप्त व्हायला लागल्या आहेत. एकेकाळी आरोग्य संवर्धनाचे काम आजीच्या बटव्यातील भाजीतून व्हायचे. नवीन पिढीला रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्व व त्यांचे गुणधर्म माहिती नसल्याने जे खाद्य आरोग्यास अपायकारक असून देखील त्यांच्या मोहात पडली असल्याचे ते म्हणाले.

( हेही वाचा – Bhagavad gita : ‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो; श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेले उत्तर वाचा…)

मिलेट्सचे (तृणधान्याचे) महत्त्व विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी जगाला पटवून दिले. या वर्षात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा केल्या जात आहे. याचा खरा शिलेदार आपला भारत देश आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देते तर राज्यातील साधारणतः १ कोटी १० लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे ६ हजार रुपये येतात. आता राज्यानेही ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय १ रुपयात पिक विमा देण्यात येत असून एक रुपयात पिक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमात्र राज्य असल्याचेही ते म्हणाले. बदलत्या स्वरूपात रानभाजी महोत्सवाची माहिती, व्हिडिओ किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना केल्या. शरीर आणि मनाचे उत्तम आरोग्य घडविणारा पदार्थ म्हणजे रानभाजी. त्यादृष्टीने, कृषी अधिकाऱ्यांनी या रानभाज्यांच्या प्रचारासाठी उत्तम नियोजन करावे. रानभाजीपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. जेणेकरून, रानभाज्यांचा उपयोग कशा पद्धतीने करावा याची माहिती मिळेल. यासाठी नागपूरमधील प्रसिद्ध आहारतज्ञ, मास्टरशेफ यांना रानभाजी महोत्सवात निमंत्रित करावे असेही मुनगंटीवार यांनी सुचवले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, राहुल पावडे, अंजली घोटेकर, राखी कंचर्लावार,डॉ.मंगेश गुलवाडे, नामदेव डाहूले, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधव तसेच महिला बचत गटाच्या महिला आदी उपस्थिती होते.

चंद्रपूर जिल्ह्याचा विकास
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देशात विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेती यामध्ये वेगाने काम होत आहे. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी मदर डेअरीसोबत बैठक घेण्यात येत आहे. शेतकरी आणि शेती सुखी आणि संपन्न करावयाची असल्यास विकेल तेच पिकवावे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यात सोमनाथ येथे अप्रतिम असे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येत असून अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.