Chess World Cup : गुकेश आणि विदितचा पराभव; एकच भारतीय जाणार उपांत्य फेरीत

अर्जुन एरीगसी आणि प्रज्ञानंद यांच्यातील लढत टायब्रेकरवर गेली आहे

184
Chess World Cup : गुकेश आणि विदितचा पराभव; एकच भारतीय जाणार उपांत्य फेरीत
Chess World Cup : गुकेश आणि विदितचा पराभव; एकच भारतीय जाणार उपांत्य फेरीत
  • ऋजुता लुकतुके

मानाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अखेर तीन भारतीय ग्रँडमास्टर खेळाडूंची विजयी घोडदौड उपउपांत्य फेरीत थांबणार आहे. अर्जुन एरीगसी आणि प्रज्ञानंद यांच्यातील लढत टायब्रेकरवर गेली आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत डी गुकेश आणि विदित गुजराथी यांचा उपउपांत्य फेरीत पराभव झाला आहे. तर प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी यांच्यातील सामना टायब्रेकरवर गेला आहे. या दोघांमधील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे एक तरी भारतीय खेळाडू अंतिम चार मध्ये दिसणार आहे हीच समाधानाची गोष्ट.

डी गुकेश भारताचा क्रमांक एकचा बुद्धिबळपटू आहे. आणि जागतिक क्रमवारीतही तो दहाव्या स्थानावर आहे. बाकू इथं सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत त्याचा मुकबला होता गतविजेता आणि माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनशी. पहिला सामना पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशने गमावला. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात गुकेशवर दडपण होतं. पण, दडपणाखालीच त्याचा खेळ बहरला. सामन्याच्या मध्यावर गुकेशने कार्लसनचं एक महत्त्वाचं प्यादं मारून सामन्यात एका प्याद्याची आघाडीही घेतली होती. काही काळ कार्लसन वेळेत चाली रचण्यातही कमी पडत होता. पण, अखेर शेवटच्या चालींमध्ये आपला खेळ सावरत कार्लसनने गुकेशला विजय मिळू दिला नाही.

(हेही वाचा – Monsoon Update : मान्सुनने फिरवली पाठ, उत्तर महाराष्ट्र पडला कोरडा!, ‘या’ जिल्ह्यांचे शेतकरी संकटात)

त्यामुळे दोन सामन्यांमध्ये कार्लसनचे १.५ गुण झाले. आणि गुकेशचा त्याने पराभव केला. गुकेशने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दिलेली लढत मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिली. दुसरीकडे विदित गुजराथी आणि नियत अबासोव्ह यांच्यातील लढत बऱ्यापैकी एकतर्फी झाली. आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या अबासोव्हने १.५ विरुद्ध ०.५ असा निर्णायक विजय मिळवला. विदित काल मॅरेथॉन सामना खेळून दमला होता. आणि कसलेल्या अबासोव्ह बरोबर सुरुवातीच्या खेळात केलेली चूक त्याला महागात पडली. अखेर ४४व्या चालीत तो चेकमेट झाला.

अशा प्रकारे दोन भारतीयांचं या सामन्यातील आव्हान संपुष्टात आलं. पण, त्याच वेळी प्रज्ञानंद आणि अर्जुन हे पटाच्या बाहेर एकमेकांचे खास दोस्त असलेले दोन भारतीय एकमेकांशी झुंजत होते. दोघांमधील दोन्ही लढती रंगल्या. आणि दुसरी लढत तर ७४ चालींपर्यंत रंगली. दोघांनी एकेक सामना जिंकल्यामुळे ही लढत आता टायब्रेकरवर गेली आहे. तिचा निकाल गुरुवारी लागेल. या स्पर्धेतून पहिले तीन खेळाडू फिडेच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी थेट निवडले जाणार आहेत. आणि कॅन्डिडेट स्पर्धेतून जगज्जेत्याला आव्हान देणारा आव्हानवीर निवडला जाईल. मॅग्नस कार्लसनने जगज्जेपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे उपांत्य फेरीतील इतर तीन खेळाडू आपोआप कॅंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतात. म्हणजेच ती संधी आता प्रज्ञानंद किंवा अर्जुन यांच्यापैकी एकाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.