Retail Inflation : जुलै ते सप्टेंबर तिमाहीतही किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज

महागाई दरासाठी रिझर्व्ह बँकेनं ४ ते ६ टक्क्यांची मर्यादा ठरवली आहे

248
Retail Inflation : जुलै ते सप्टेंबर तिमाहीतही किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज
Retail Inflation : जुलै ते सप्टेंबर तिमाहीतही किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज
  • ऋजुता लुकतुके

भाजीपाला आणि अन्नधान्यातील महागाई आणखी दोन महिने तरी अशीच राहणार असा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या बुलेटिनमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशाचा महागाई दरही सहाच्या वरच राहील अशी लक्षणं आहेत. महागाई दरासाठी रिझर्व्ह बँकेनं ४ ते ६ टक्क्यांची मर्यादा ठरवली आहे. पण, यंदा जुलै महिन्यात महागाई दर या उद्दिष्टापेक्षा चांगला दीड टक्का वर गेला. तर आणखी दोन महिने म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही महागाई दर सहाच्या वरच राहील असा अंदाज खुद्द रिझर्व्ह बँकेनं मासिक बुलेटिनमध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी ऑक्टोबर पतधोरणात रेपो रेटविषयी मध्यवर्ती बँक पुन्हा काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

‘भाज्या आणि इतर कृषिमालाचा पुरवठा जुलै महिन्यात म्हणावा तसा झाला नाही. आणि या बसलेल्या धक्क्यातून बाजारपेठ अजून सावरलेली दिसत नाही. ऑगस्टचा पहिला आठवडा सरला तरी पुरवठा सुरळीत झालेला नाही. हे पाहता, अन्नधान्यातील महागाई आणखी दोन महिने कायम राहील असं दिसत आहे,’ असं रिझर्व्ह बँकेच्या ‘अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती’ या लेखात लिहिलं आहे. हा लेख काही अर्थतज्जांनी मिळून लिहिला आहे. आणि यात रिझर्व्ह बँकेचे उपगव्हर्नर मायकेल पात्रा हे सहलेखक आहेत.

अर्थात, दर महिन्याला रिझर्व्ह बँकेकडून असं बुलेटिन काढण्यात येतं. आणि त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच अर्थत्ज्जांचे अर्थव्यवस्था तसंच बँकिंगवरील लेख प्रसिद्ध करण्यात येतात. या लेखातील मतं ही लेखकांची वैयक्तिक असतात. ते रिझर्व्ह बँकेचे अधिकृत अंदाज नसतात. पण, यावेळचं रिझर्व्ह बँकेचं बुलेटिन १४ ऑगस्टच्या महागाई दराच्या आकड्‌यांनंतर निघालेलं आहे. त्यामुळे या लेखाची वेगळी चर्चाही रंगायला सुरुवात झाली आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेनं जुलै ते सप्टेंबर तिमाहीत देशाचा महागाई दर ६.२ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. पण, जुलै महिन्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज चुकला. आणि महागाई दर ७.४४ टक्के इतका राहिला. अजूनही अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही महागाई दर मध्यवर्ती बँकेच्या अंदाजापेक्षा जास्तच राहील असं आता दिसतंय. आगामी काळातील महागाई दराचा अंदाज व्यक्त करताना या लेखात दोन महत्त्वाची कारणं देण्यात आली आहेत.

(हेही वाचा – Non AC Vande Bharat : आता प्रवास होईल स्वस्तात मस्त!, पहिली नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच होणार सुरु)

रब्बी हंगामावरही अल निनोचा प्रभाव :
अनियमित पाऊस आणि पिकाला लागलेल्या किडीमुळे यंदाचा खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. आणि त्यातून बाजारपेठेतली भाजी आणि अन्नपदार्थांची आवक कमी झाली. महागाईचं मुख्य कारण विस्कळीत झालेली पुरवठा साखळी हेच होतं.

आता रब्बी हंगामातही अल निनोचा प्रभाव राहील, असा जाणकारांचा हंगाम आहे. हवामानातील अनियमिततेमुळे काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी दुष्काळ असतो. आणि पिकाचं मात्र नुकसान होतं. पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पाऊस पिकाची नासाडी करतो. आणि शेतीचा पुढचा हंगामही अशी संकटं शेतकऱ्यासमोर घेऊन आला तर हे वर्ष अन्नसाखळीसाठी चांगलं असणार नाही, असं जाणकारांना वाटतं.

कच्च्या तेलाच्या किमती :

इंधनाचा तुटवडा हा नेहमीच महागाईवर प्रतिकूल परिणाम करतो. आणि शेतीतील अवजारं वापरताना इंधन खर्च होतं तसंच ते मालाच्या वाहतुकीतही खर्च होतं. आणि इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार असतील तर अन्नधान्याचेही त्या प्रमाणात वाढू शकतात.

भारत ८० टक्के इंधनाची गरज आयातीवर भागवत असतो. आणि इंधन क्षेत्रातही रशिया-युक्रेन युद्ध, काही देशात संपत चाललेले तेलाचे साठे यामुळे पुरवठ्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे तेलाचे भाव वाढत आहेत. ते तसेच वाढत राहिले तर महागाईवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. या दोन महत्त्वाच्या घटकांमुळे येणाऱ्या दोन महिन्यात तरी महागाई दर चढाच राहील असा अंदाज व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.