वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नवीन निर्देश! कसा असेल पुरवठा?

वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

159

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून, ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.

उत्पादन वाढवण्याचे निर्देश

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. असे असताना दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊनवरुन सत्ताधा-यांमध्येच विरोधाचा सूर!)

वैद्यकीय क्षेत्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा

राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार, आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी ८० टक्के वैद्यकीय वापराकरता तर उर्वरित २० टक्के औद्योगिक वापराकरता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यायचे असून, वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

३० जूनपर्यंत अधिसूचना लागू

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे. ही अधिसूचना ३० जून २०२१ पर्यंत लागू राहणार असल्याचे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.