गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार उसळला आहे. उखरुल जिल्ह्यातील कुकी थोवाई येथे १८ ऑगस्टला जोरदार गोळीबार झाला. त्यानंतर ३ युवकांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळले. तांगखुल नागांचे प्राबल्य असलेल्या उखरुल जिल्ह्यात प्रथमच असा हिंसाचार झाला आहे. लिटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे गोळीबाराचे आवाज मोठ्या प्रमाणात ऐकू आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता २४ ते ३५ वर्षांदरम्यानच्या ३ युवकांचे मृतदेह आढळले. जामखोगिन (वय २६), थांगखोकाई (वय ३५) आणि हॉलेसन (वय २४) असे मृत युवकांची नावे असल्याचे कुकी समुदायाची संघटना ‘इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम’ने सांगितले. या तिघांच्या शरीरावर चाकूच्या तीक्ष्ण वारांच्या खुणा होत्या आणि त्यांची बोटेही तोडण्यात आली आहेत. संशयित मैतेई आणि गावाचे रक्षण करणारे कुकी स्वयंसेवक यांच्यात गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचार चालूच; तिघांची निर्घृण हत्या)
अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आल्यानंतर ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आतापर्यंत हिंसाचारात १६० जणांनी प्राण गमावले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येत मैतेईंचे प्रमाण सुमारे ५३ टक्के असून ते प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असून ते पर्वतीय जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यियांगपोकी येथे मैतेई नागरिक असून हे ठिकाण देखील घटनास्थळापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.
हिंसाचारामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी नागरिकांनी दुप्पट मेहनत करावी – बिरेन सिंह
”मे महिन्यापासून वांशिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि जनजीवन सुरळीत करण्याला सर्वाधिक प्राधान्य आहे. गैरसमजातून आणि पूर्वग्रहदूषित विचाराने राज्यातील शांतता भंग केली जात आहे. परदेशात रचलेल्या कारस्थानामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार उसळत आहे. दुसऱ्या समुहाला नाराज करणाऱ्या टिप्पण्या किंवा चर्चा करणे सर्वांनी टाळावे. हिंसाचारामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी नागरिकांनी दुप्पट मेहनत करावी”, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले. राज्याच्या कल्याणासाठी आणि एकात्मतेसाठी सकारात्मक सूचना आणि सल्ला देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
मणिपूरमधील कुकीबहुल पर्वतीय भागांसाठी स्वतंत्र मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक देण्याची विनंती राज्यातील कुकी आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एन. बिरेन सिंह म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला मोकळेपणाने बोलण्याचा अधिकार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community