प्रो-कबड्डीच्या धर्तीवर राज्यात पहिल्यांदाच प्रो-गोविंदा स्पर्धा होणार आहे. वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये ३२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत ही स्पर्धा होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, ”राज्यभरातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून, मुंबईतील २० गोविंदा पथकांतील ३ हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे. अपघात होऊ नये, यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास १० लाख रूपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
(हेही वाचा – Minority Scholarship Scam : बनावट मदरसे आणि विद्यार्थी दाखवून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक)
गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. वरळी भागातील इनडोअर स्टेडियमध्ये ४० फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहिती सामंत यांनी दिली.
दर्जेदार खेळाडू तयार होतील – क्रीडामंत्री
दहीहंडी या पारंपरिक खेळाचे रूपांतर उत्सवात झाले आहे. प्रो-गोविंदा स्पर्धेतून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. या स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून याला साहसी खेळ म्हणून क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.
११ लाखांचे बक्षिस
प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस ११ लाख रूपये, दुसरे बक्षिस ७ लाख रूपये, तिसरे बक्षिस ५ लाख रूपये आणि चौथे बक्षिस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल १ लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community