मुंबईतील दैनंदिन रुग्ण संख्या १० हजारांवर होणार! महापालिका आयुक्तांचा अंदाज

६५० आयसीयू बेड व २५० व्‍हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. आवश्‍यकतेनुसार एकूण रुग्णशय्या वाढविण्‍याची कार्यवाही वेगाने सुरु आहे, असे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले.

133

मुंबईमध्ये दररोज कोविड रुग्णांची संख्या सहा हजारांवर गेली असली, तरी भविष्यात ती संख्या दररोज १० हजारांवर जावू शकते, अशी शक्यता महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये चाचण्‍यांची संख्‍या लवकरच ६० हजार प्रतिदिन होणार असून त्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या प्रमाणानुसार रुग्णांचीही संख्या वाढणार आहे. मात्र, बाधितांपैकी रुग्‍णशय्येची आवश्‍यकता भासणाऱ्यांची संख्‍या सध्‍याची स्थिती पाहता तुलनेने खूप कमी असेल, असे स्पष्ट केले आहे.

६५० आयसीयू बेड व २५० व्‍हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्‍ध

मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील भव्‍य कोविड केंद्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी लस महत्‍त्‍वाची असून सर्व पात्र नागर‍िकांनी कोविड लस टोचून घ्‍यावी, असे आवाहन चहल यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना केले. मुंबईत कोविड उपचारांसाठी रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. आजही ६५० आयसीयू बेड व २५० व्‍हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. आवश्‍यकतेनुसार एकूण रुग्णशय्या वाढविण्‍याची कार्यवाही वेगाने सुरु आहे, असे आश्‍वस्‍त करतानाच कोविड निर्बंधांचे पालन नागरिकांनी केले नाही तर आवश्‍यक त्‍याबाबतीत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही चहल यांनी स्‍पष्‍टपणे नमूद केले.

(हेही वाचा : कोरोना टेस्ट से नहीं क्वारंटाईन से डर लगता है बाबू!)

लसीकरण क्षमता दररोज १ लाखांवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न!

मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागर‍िकांची संख्‍या सुमारे ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्‍यात आले आहे. त्‍यातही बीकेसी कोविड केंद्रातील लसीकरण केंद्र हे आजमितीस देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र असल्‍याचे सांगून अधिष्‍ठाता डॉ. राजेश डेरे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मुंबईतील सध्‍याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून ती दररोज १ लाखांवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. सध्‍या ५९ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी असून त्‍यांनी लसीकरणाची दैनंदिन संख्‍या वाढवावी, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. एकत्रित प्रयत्‍नातून लसीकरणाची संख्‍या वाढेल. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्‍यात येईल, असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पूर्वीप्रमाणेच वॉर्ड वॉर रुम कार्यान्वित!

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्‍यांची संख्‍या आणि वेग वाढविण्‍यात आला आहे. स्‍वाभाविकच बाधित रुग्‍ण मोठ्या संख्‍येने शोधून काढणे, त्‍यांना वेळीच विलगीकरण करुन गरजू रुग्‍णांना योग्‍य उपचार देणे शक्‍य होत आहे. चाचण्‍यांची संख्‍या लवकरच ६० हजार प्रतिदिन होणार असून त्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या प्रमाणानुसार बाधितांची संख्‍या दररोज १० हजारपर्यंत आढळू शकते. या बाधितांपैकी रुग्‍णशय्येची आवश्‍यकता असणाऱयांची संख्‍या सध्‍याची स्थिती पाहता तुलनेने खूप कमी असेल. मुंबईतील कोविड मृत्‍यू दर देखील आता अल्‍प आहे. वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येसाठी रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन (बेड मॅनेजमेंट) पूर्वीप्रमाणेच वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येत आहे. काही व्‍यक्‍ती परस्‍पर वैद्यकीय प्रयोगशाळांकडून चाचणीचा अहवाल प्राप्‍त करुन खासगी रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णशय्या मिळवण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.