पुणे शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गेल्या वर्षी गणेशोत्सव परवाना घेतला असल्यास, तोच परवाना 2026 सालापर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे मंडळांना नवे परवाने घेण्याची आवश्यकता नाही तसेच येत्या गणेशोत्सवातील दहापैकी सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी एका बैठकीत दिली.
शहर व जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडी हे उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत यासाठी प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निलम गोऱ्हे यांनी मंडळांना हे आवाहन केले तसेच ज्या गणेश मंडळांनी आधी परवाने घेतले नसतील, त्या मंडळांनी परवानगीसाठी अर्ज करावेत, असेही त्या म्हणाल्या.
नागरिकांनी आपापल्या सूचना जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाकडे सादर कराव्यात. त्या कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या सूचनांवर प्रशासनाच्या वतीने सकारात्मक दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येईल. या बैठकीत प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार,पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अंकित गोयल आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community