माननीय उच्च न्यायालयात मुंबईतील सेवा वाहिन्यांवरील मॅनहोल्सबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी सर्व विभागाच्या सहायक आयुक्त तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रविवारी ही सर्व पाहणी पूर्ण करून याचा अहवाल सोमवारी सकाळी महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाकडून मुंबईच्या हद्दीत सर्व २४ प्रशासकीय विभागनिहाय तज्ज्ञ वकील नियुक्त करण्यात आल्याने सोमवारी सहायक आयुक्तांसह याची संयुक्त पाहणी केली जाणार आहे. या पाहणीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात झाकणे बंद केलेली आहेत की कागदोपत्री अहवाल तयार करून आणलाय हे उघड होईल.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालय किंवा मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपल्या अखत्यारितील मॅनहोल झाकण लावून बंद असल्याची पुन्हा एकदा खातरजमा अशी सूचना मागील आठवड्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी केली होती. त्यामध्ये आयुक्तांनी २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ही कार्यवाही करुन त्याची पूर्तता केल्याबाबत २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देशही प्रशासनाने होते.
त्या आधी दोन महिन्यांपूर्वी म्हणजे दिनांक १४ जून २०२३ रोजी सर्व विभागांचे सहायक आयुक्त आणि मध्यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना निर्देश दिले होते की, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालयाच्या अखत्यारितील किंवा मध्यवर्ती खात्यांच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सोमवार, १९ जून २०२३ पूर्वी सर्वेक्षण करावे. तसेच, एकही मॅनहोल खुले तथा उघडे राहणार नाही, याची खात्री करावी. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. उपआयुक्त (पायाभूत सुविधा) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी पूरप्रवण असलेल्या भागांमध्ये मिळून ६ हजार ३०८ मॅनहोल्सवर प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्या आहेत. अशा सर्व मॅनहोल्सची स्वतंत्र आणि विभाग कार्यालय निहाय यादी तयार करुन सर्व सहायक आयुक्त व मध्यवर्ती यंत्रणांचे प्रमुख यांनी त्याची खातरजमा करण्याच्या सूचनांचा अंतर्भाव होता.
(हेही वाचा – Zepto Job Call : एका व्हायरल झालेल्या ट्विटमुळे विद्यार्थ्याला कंपनीच्या मालकांनीच मुलाखतीसाठी थेट बोलावलं)
त्यामुळे आयुक्तांनी, तत्काळ सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांची नेमणूक करावी व त्यांना प्रत्येकाला ठराविक संख्येने मॅनहोल तपासण्याची जबाबदारी द्यावी. तसेच ते सर्व मॅनहोल बंद आहेत का? नसल्यास बंद केल्याची कार्यवाही केली आहे का?, याची सगळी खातरजमा करुन त्यांच्याकडून कार्यपूर्ततेचे प्रमाणपत्र घ्यावे. संयुक्त पाहणी सुरु होण्यापूर्वी आठवडाभराचा वेळ असल्याने निश्चितच ही कार्यवाही पूर्ण होऊ शकते. त्यामुळे त्याला वेग द्यावा. सर्व कार्यवाहीची कागदपत्रं सादर करावीत, अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासकांचे होते.
त्यानुसार २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याची अंतिम होती आणि याची पूर्तता केल्याबाबत २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाकडून मुंबईच्या हद्दीत सर्व २४ प्रशासकीय विभागनिहाय तज्ज्ञ वकील नियुक्त करण्यात आहेत. हे तज्ज्ञ वकील तसेच सहायक आयुक्त संयुक्तपणे सोमवार २१ ऑगस्ट प्रत्यक्ष क्षेत्रावर पाहणी करुन मॅनहोल्स झाकण लावून व्यवस्थित बंद आहेत किंवा कसे, पावसाळी पूरप्रवण क्षेत्रात मॅनहोलच्या झाकणाखाली जाळी लावली आहे किंवा कसे, याची पाहणी करणार आहेत. संबंधित वकील व सहायक आयुक्त यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अहवाल तयार करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत सादर केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community