बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याला राज आणि फडणवीसांना निमंत्रणच नाही!

134

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा ३१ मार्च रोजी पार पडत आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. या भूमीपूजन सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण देण्यात आलेले नाही.

भाजपला डावलले

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या एकाही नेत्याला भूमीपूजन सोहळ्याचे निमंत्रण न दिल्याने शिवसेनेने भाजपला या कार्यक्रमापासून दूर ठेवले की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता दादरच्या महापौर निवास येथे हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या उपस्थितांसह भूमीपूजन समारंभ होणार असून, कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण होणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

कुणीही मला कार्यक्रमासाठी संपर्क केला नाही. या स्मारकासाठी ज्या देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यांना देखील निमंत्रण दिले नाही. बाळासाहेब यांच्या कार्यक्रमात पक्षीय अभिनिवेश बाळगला आहे. बाळासाहेबांवर सर्वांची श्रद्धा आहे. पण तरीही आम्हाला डावलण्यात आले आहे.

-प्रवीण दरेकर, विरोधीपक्ष नेते

२०१७ला मिळाली होती स्मारकासाठी मंजुरी

दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोरील महापौर निवासस्थान आणि परिसरातील ११ हजार ५५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. महापालिकेची सुधार समिती आणि त्यानंतर महापालिकेच्या मंजुरीनंतर ही महापौर निवासस्थानाची जागा शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला ३० वर्षांकरता देण्यात आली. २७ फेब्रुवारी २०१७ला महापालिकेच्या मंजुरीनंतर या न्यासाला ही जागा देण्याची सर्वप्रकारची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जानेवारी २०१९मध्ये प्रत्यक्ष स्मारकाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा आराखडा तयार करुन, पुढील कार्यवाही करण्यासाठी एमएमआरडीएवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.