आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भारतातील सर्वात वयोवृद्ध आशियाई पाळीव हत्ती मरण पावला. तो 89वर्षाचा होता. बिजुली प्रसाद असे या हत्तीचे नाव होते.
विल्यमसन मगोर ग्रुपच्या बेहाली येथील चहाच्या मळ्यात या हत्तीने पहाटे 3:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. वाढत्या वयाशी संबंधित समस्यांमुळे तो मरण पावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिजुली प्रसादला ओळखणारे अनेक प्राणीप्रेमी, चहा बागेतले कामगार तसेच स्थानिक लोकांनी त्याच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याला अखेरचे बघण्यासाठी अनेक जण चहाच्या मळ्यात जमले होते.
(हेही वाचा – Talathi Parikshaअखेर पाच तासांनी झाली परीक्षा)
बिजुली प्रसाद हा हत्ती विल्यमसन मगोर ग्रुप या कंपनीकरिता अभिमानास्पद होता. त्याला अगदी लहान असताना आणले गेले होते. चहाचे मळे विकल्यानंतर त्याचे स्थलांतर करण्यात आले. तेव्हापासून तो बारगंग चहाच्या मळ्यातच राहात होता तसेच कंपनीच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर त्याने त्याचे उर्वरित आयुष्यही बारगंग चहाच्या मळ्यात राजेशाही थाटात व्यतीत केले, अशी माहिती चहा बागेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बिजुली प्रसाद हा भारतातील सगळ्यात वयोवृद्ध पाळीव हत्ती होता. साधारणत: जंगली एशियाटिक हत्ती 62 ते 65 वर्षेच जगतात, पण पाळीव हत्तींची योग्य काळजी घेतली तर ते 80 वर्षांपर्यंत जगतात. 8-10 वर्षांपूर्वी त्याचे सर्व दात पडल्यानंतर तो काहीही खाऊ शकला नाही. त्यानंतर त्याच्यावरील उपचारांना सुरुवात करण्यात आली. त्याच्या नियमित आहारात बदल करण्यात आला. उकडलेले अन्नपदार्थ तांदूळ, सोयाबिन असा उच्च प्रथिनयुक्त आहार त्याला देण्यात आला. यामुळे त्याचे आयुष्य वाढले, अशी माहिती बिजुली प्रसाद या हत्तीविषयी पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध हत्ती शल्यचिकित्सक डॉ. कुशल कोंवर सरमा यांनी दिली आहे.
हेही पहा –