शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी उबाठा शिवसेना Shivsena गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. सुनावणीच्या वेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सहआरोपी असलेले संजय राऊत यांनी न्यायालयात स्वतः हजेरी लावली होती. यानंतर या दोघांनी आपला जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला
या प्रकरणातील पुढची सुनावणी ही 14 सप्टेंबर रोजी होणार असून त्या वेळी या दोघांनाही हजेरी लावावी लागेल. उद्धव ठाकरे हे राज्यातील अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीवेळीही उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावतील.
काय आहे हे प्रकरण?
खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली होती. दुबईतील कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये राहुल शेवाळे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला होता. यामुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
Join Our WhatsApp Community