एकीकडे राज्यात कोरोनाची वाढती आकडेवारी ही सरकारची डोकेदुखी ठरत असताना आता राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.
काय म्हणाले शिंगणे?
कोरोना काळात राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असेही शिंगणे यांनी म्हटले.
(हेही वाचा : दादर, माहिमने गाठली शंभरी!)
मुंबईत उपलब्ध रक्ताचा साठा आणि मुंबईची गरज!
मुंबईत दिवसाला 600 ते 800 युनिट रक्ताची गरज आहे. सध्या मुंबईत 3,800 ते 4,000 युनिट रक्ताचा साठा आहे. मुंबई फक्त 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्त उपलब्ध आहे. लसीकरणामुळे रक्त साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान लहान रक्तदान शिबीरे घेऊन रक्तदान वाढवण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
राजेश टोपेंनी केले आवाहन!
एप्रिल आणि मे महिन्यात नेहमीच रक्त तुटवडा निर्माण होतो. मोठा रक्तदातावर्ग हा तरुण महाविद्यालयीन वर्ग आहे. राज्यात कोरोना वाढतोय. त्यामुळे विद्यार्थी आणि आय टी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरु आहे. लसीकरणाची मोहिम जोरात सुरु आहे. त्यामुळे लस दिल्यानंतर 28 दिवस रक्तदान न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रक्त संकलनासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, राजेश टोपे यांनी राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जनतेला लहान लहान रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना देखील आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community