भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय मुंबईकरांसाठी सहलीचे आवडते ठिकाण बनले आहे. या उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध प्रकारची झाडे, झुडपे, फुलझाडे, दुर्मिळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी साऊथ इंडियन इज्युकेशन सोसायटीच्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळेच्या एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना उद्यानाविषयी, निरनिराळ्या फुलझाडांविषयी माहिती दिली. वनस्पतिशास्त्राबाबत जे ज्ञान, माहिती शाळेच्या चार भिंतीत मिळाली नसती ती आज उद्यानात मिळाली, अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात. उद्यानातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयातील निरनिराळे प्राणी पाहण्यासाठी शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी उसळते. मात्र या उद्यानात आणि प्राणिसंग्रहालयात केवळ विरंगुळा आणि मनोरंजन होत नसून, येथे विद्यार्थ्यांना शालेय सहलीमार्फत विविध प्रकारचे ज्ञान आणि माहितीही उपलब्ध होत आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थी येथे प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्राचा चिकित्सक अभ्यासही करीत आहेत.
(हेही वाचा – Special Block : ठाणे स्थानकात गर्डर टाकण्यासाठी विशेष ब्लॉक)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उद्यानाकडे कल :
राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानविद्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी सदर उद्यानात येत असतात. काही विद्यार्थी वनस्पतिशास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाची निवड करीत आहेत. निसर्गसंपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासाला मिळत असल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयक रुची वाढत आहे. गत तीन महिन्यांपासून घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयातील वंदना यादव (एमएससी, वनस्पतिशास्त्र विभाग), कल्याण येथील बी. के. बिर्ला ऑटोनॉमस महाविद्यालयातील सायली राहतवाल आणि नक्षत्रा शिंदे (पर्यावरणशास्त्र विभाग) या विद्यार्थिनी उद्यानातील रोपांचे वर्गीकरण आणि ओळख, उद्यानातील रोपांचे संगोपन तसेच पक्ष्यांचे जीवनमान, झाडांचे महत्त्व आणि फुलपाखरे आदींचा अभ्यास करताहेत. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि येथील अभ्यासक, अधिकारी, कर्मचारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील अभ्यासक विद्यार्थीनी जुलीया कनेको हीदेखील उद्यानात आठ दिवसांसाठी अभ्यास दौऱ्यावर येऊन गेली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community