महाराष्ट्रात पावसाने जुलै महिन्यात जोर दिला, काही भागातील धरणे भरली परंतु अर्ध्या महाराष्ट्रातील धरणे कोरडीच राहिली आहेत. राज्याला अजून जास्तीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. कारण ऑगस्ट महिना उलटला तरी पावसाला अजून जोर आला नाही. त्यामुळे आता पासूनच राज्यातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे.
जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात तब्बल 369 टँकर्सने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास 350 गावे आणि 1,399 वाड्यांमध्ये टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहे. मागील वर्षी याच दिवशी राज्यभरात फक्त 10 गावे आणि 14 वाड्यांना आठ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र पाऊस दडी मारुन बसल्याने टँकरच्या संख्येत जास्त भर पडली आहे.
(हेही वाचा Moon : चीन-अरबांनी भारताकडून शिकले चंद्र कॅलेंडर, काय आहे चंद्राचे महत्व?)
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणीपुरवठा सुरू?
राज्यभरात जवळपास 350 गावे आणि 1,399 वाड्यांमध्ये 369 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांना मिळून 153 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी पुणे जिल्ह्याला 40 टँकर्स, सातारा 40 टँकर्स, सांगली 29 टँकर्स आणि सोलापूरमध्ये 10 टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर नाशिक विभागामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये 141 गाव आणि 392 वाड्यांना 127 टँकर्सने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 58 टँकर्स, जळगाव 14 टँकर्स आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 55 टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 57 गावं आणि 22 वाड्यांना 84 टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 41 टँकर्स आणि जालनामध्ये 43 टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे.
Join Our WhatsApp Community