अवघा महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. रुग्ण संख्या दिवसागणिक वाढते आहे, आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून जिथे जिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला होता. मात्र औरंगाबादचे खासदार, एमआयमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकत दादागिरी करून हा लॉकडाऊन रद्द करवून घेतला. त्यानंतरही जलील यांनी मिरवणूक काढून याचा आनंद साजरा केला. त्यासाठी अक्षरशः शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कुणीही मास्क लावले नव्हते कि सामाजिक अंतर ठेवले नव्हते. अशा प्रकारे कोरोनाच्या नियमांचे जलील यांच्याकडून उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे जलील यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला!
कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात बुधवार, ३१ मार्चपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला होता. मात्र या निर्णयाला काही भाजप, मनसे, एमआयएम आणि व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा विरोध होता. इम्तियाज जलील यांनी तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी, ३० मार्च रोजी लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जलील भलतेच खूश झाले. त्यांनी भर रस्त्यात कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. हारतुरे घालून घेतले. हे करताना कोरोनाबाबतच्या नियमांची पूर्णतः पायमल्ली केली.
मनसेने केली टीका!
यावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. यावर बोलताना खोपकर म्हणाले कि, एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाउन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर आहे असं असताना असा जल्लोष करताना, नाचताना शऱम वाटायला पाहिजे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021