पालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील ६ वॉर्डच्या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी काल मध्यरात्री भेट दिल्यानंतर या ६ वॉर्डचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर म्हणजे १२ तासांच्या आत या कामांना सुरुवात झाली आहे.
(हेही वाचा – Onion : एकेकाळी सरकारे पाडली होती कांद्याने; पुन्हा एकदा कांदा पेटलाय)
मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार तत्काळ याठिकाणी काम सुरु करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले. या सहाही वॉर्डमधील नूतनीकरण सुरु झाले आहे.
या सहा वॉर्डच्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी (मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन) यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी बांधकामाच्या किरकोळ कामांना आजपासून सुरुवात झाली. ही कामे वेगाने व्हावीत मात्र, त्याचवेळी त्यांचा रुग्णांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने दिवसरात्र काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केल्या आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक ४, ४अ, ६, ७, ११ आणि १२ या 6 वॉर्डचा समावेश आहे. याआधी या प्रत्येक वॉर्डचे काम स्वतंत्रपणे करण्याचे नियोजित होते. तथापि, रुग्णशय्या पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर उपयोगात याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता संपूर्ण 6 वॉर्डचे काम एकाचवेळी हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
या प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० इतकी रुग्णसेवा देण्याची क्षमता आहे. नूतनीकरणानंतर या ६ वॉर्डच्या उपलब्धततेमुळे सुमारे ४२० रुग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. परिणामी रुग्णालयाच्या सुविधांमध्ये भर पडतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देता येतील, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community