India : आता भारतात नवीन गाड्यांची होणार ‘क्रॅश टेस्ट’, नंतरच ठरणार त्यांचा दर्जा; काय आहे हे प्रकरण?

135

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) लाँच केला. या कार्यक्रमांतर्गत भारतात उत्पादित आणि विकल्या जाणार्‍या कारची क्रॅश चाचणी केली जाईल आणि त्यांना सुरक्षा रेटिंग दिले जाईल. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेत आणखी सुधारणा करता येईल. आतापर्यंत देशात उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या वाहनांना परदेशी ग्लोबल एनसीएपी एजन्सीद्वारे सुरक्षा रेटिंग दिली जात होती आणि त्यासाठी वाहने परदेशात पाठवावी लागत होती किंवा चाचणी एजन्सी स्वतःच वाहने घेऊन जात होती. आता भारताचा स्वतःचा कार मूल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत वाहनांवर स्वदेशी रेटिंग दिसेल.

भारत बनला ५वा देश

स्वतःचे क्रॅश चाचणी रेटिंग प्लॅटफॉर्म असलेला भारत आज जगातील पाचवा देश बनला आहे. ग्लोबल NCAP ने (MORTH) मंत्रालयासह संयुक्तपणे इंडिया NCAP क्रॅश चाचणी रेटिंगची घोषणा केली आहे. सरकारने सुरू केलेल्या या ‘न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’ (भारत NCAP) अंतर्गत, कार क्रॅश रेटिंग १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केले जाईल.

उत्तीर्ण झाल्यानंतर आता वाहनांवर असे स्टिकर दिसेल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भारत एनसीएपीच्या नवीन लोगो आणि स्टिकर्सचे अनावरण केले. यादरम्यान ते म्हणाले, ‘आजचा दिवस देशाच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठी तसेच संपूर्ण समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आम्ही अधिकृतपणे इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम सुरू करत आहोत.’ नितीन गडकरी यांनी असेही जाहीर केले की, भारत एनसीएपीला आधीच ३० मॉडेल्सच्या क्रॅश चाचण्यांसाठी विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. नितीन गडकरी यांनी हे देखील मान्य केले की कार सुरक्षेव्यतिरिक्त रस्ते अभियांत्रिकी ही देखील एक मोठी समस्या आहे ज्याकडे मंत्रालयाकडून लक्ष दिले जात आहे.

(हेही वाचा Onion : एकेकाळी सरकारे पाडली होती कांद्याने; पुन्हा एकदा कांदा पेटलाय)

भारत एनसीएपी म्हणजे काय?

भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) हा क्रॅश चाचणी मूल्यमापन कार्यक्रम आहे, जो क्रॅश चाचणीनंतर वाहनांच्या कामगिरीवर आधारित ० ते ५ स्टार रेटिंग देईल. जसे तुम्ही आतापर्यंत ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत पाहिले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशातील कारच्या क्रॅश चाचणीसाठी आणि त्यांना सुरक्षा रेटिंग देण्यासाठी मापदंड निश्चित केले आहेत. वाहन उत्पादक आता त्यांच्या वाहनांना चाचण्यांच्या आधारे सुरक्षा रेटिंग देतील, ज्यामुळे कार खरेदीदारांना वाहन निवडणे सोपे होईल.

सरकारने भारत NCAP च्या चाचणी प्रोटोकॉलला जागतिक क्रॅश-टेस्ट प्रोटोकॉलशी संरेखित केले आहे आणि नवीन मानके त्यांच्या वेबसाइटवर १ ते ५ तार्यांपर्यंत स्टार रेटिंग दर्शवतील. हे देशात उत्पादित किंवा आयात केलेल्या ३.५ टन पेक्षा कमी वजनाच्या ‘M1’ श्रेणीच्या मंजूर मोटार वाहनांना लागू होईल. M1 श्रेणीची मोटार वाहने प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरली जातात, ज्यामध्ये चालकाच्या सीट व्यतिरिक्त जास्तीत जास्त ८ जागा असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.