अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस जपानच्या दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांना आता खुले मैदान मिळाले आहे. आपल्याशी संबंधित नसलेल्या खात्यांच्या बैठकाही ते घेऊ लागले आहेत. त्यामुळे ‘भाई’गिरीला ‘दादा’गिरी वरचढ ठरू लागली आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा – Sharad Pawar On Onion Issue : केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा – शरद पवार)
राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे ‘भाई’, तर अजित पवार ‘दादा’ म्हणून परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्याची सुरुवात झाली ती ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या स्थापनेवरून. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘वॉर रूम’ व्यापक स्तरावर काम करीत असताना, अजित पवार यांनी त्याला समांतर असे ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ सुरू केले. हा सरळ सरळ मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची टीका त्यावेळी झाली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सारवासारव करण्यात आली.
हे वादळ शांत होत नाही, तोवर अजित पवार यांनी भर कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्याचे प्रमुख ज्या विभागाचे प्रतिनिधित्त्व करतात, त्या ठाण्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजणे हे चांगले लक्षण नाही. ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’, असा थेट सवाल विचारत त्यांनी एकनाथ शिंदे यांना घेरले. त्यामुळे शिंदे तर नाराज झालेच, पण शिवसेनेचे मंत्रीही अस्वस्थ झाले. काल परवा सत्तेत सहभागी झालेली व्यक्ती थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारते, हे त्यांना रुचले नाही.
केवळ शिवसेनाच नव्हे, तर अजित पवार यांनी भाजपाकडील खात्यांमध्येही घुसखोरी सुरू केली आहे. सोमवारी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील पशुसंवर्धन खात्याची बैठक बोलावली. या विभागाला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परंतु, विखे पाटील मुंबईत असूनही तिकडे फिरकले नाहीत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. विखे पाटील यांनी ही बाब जपानमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. त्यांनी त्याची नोंद घेत याबाबत अजित पवारांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
नाराजी व्यक्त करणार कुणाकडे ?
अलीकडेच सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांची ‘दादागिरी’ महायुतीमधील घटक पक्षांना खटकू लागली आहे. शिवसेनेचे नेते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करीत असले, तरी भाजपाचे मंत्री आणि आमदारांना तशी सोय नाही. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीने अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना दुखवायचे नाही, अशी सक्त ताकीद वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सुरू असलेल्या या ‘दादागिरी’विषयी नाराजी कुणाकडे व्यक्त करायची, असा पेच भाजपाच्या राज्यातील नेत्यांसमोर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community