BMC : सरकारचे महापालिकेकडे दुर्लक्ष : २६ दिवसांनंतरही अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची रिकामीच

अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली २७ जुलै २०२३ रोजी झाली. मात्र, तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तांची ही खुर्ची आणि त्यांचे दालन रिकामेच आहे.

166

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली होऊन तब्बल २६ दिवस उलटत आले, तरी त्यांच्या या रिक्त जागी अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महापालिका अस्तित्वात नसल्याने मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त जागी त्वरीत सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती होणे आवश्यक होते. परंतु २६ दिवस उलटत आले तरी हर्डीकर यांच्या बदलीने रिक्त झालेली ही खुर्ची रिकामीच आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची बदली झाल्यानंतर २ मे २०२३ रोजी या रिक्तपदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २८ दिवसांची मसुरीचे प्रशिक्षण आणि त्यानंतर या पदाचा भार सांभाळणाऱ्या हर्डीकर यांची अवघ्या ८७ दिवसांमध्येच महामेट्रोच्या नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. हर्डीकर यांची बदली २७ जुलै २०२३ रोजी झाली. मात्र, तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तांची ही खुर्ची आणि त्यांचे दालन रिकामेच आहे.

यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी म्हणजे २४ मे २०२२ रोजी आशिष शर्मा यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर प्रथमच हर्डीकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी पुन्हा एकदा २६ दिवसांचा कालावधी उलटूनही कोणाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे ज्या महापालिकेत येण्यासाठी पूर्वी सनदी अधिकारी उत्सुक होते, त्याच महापालिकेत आता हे अधिकारी येण्यास तयार नाही की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा Chandrayaan – 3 : 70 वर्षात जगभरातील देशांच्या 111 चंद्रमोहिमा; किती झाल्या अपयशी, किती झाल्या यशस्वी?)

अतिरिक्त आयुक्त हर्डीकर यांच्याकडे शहर विभागाची जबाबदारी होती आणि त्यांच्या बदलीनंतर या पदाचा अतिरिक्त कारभार हा अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (प्रकल्प) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे परवाना, देवनार कत्तलखाना, प्रिटींग प्रेस, करनिर्धारण व संकलन, मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचलन आदी विभागांचा कार्यभार आहे. मुळात सध्या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईची मोहिम जोरात असून या विभागाला आता अतिरिक्त आयुक्तच नाही. तसेच मलनि:सारण प्रकल्प आणि मलनि:सारण प्रचलन विभागाची कामेही महत्वाची असून या विभागाला २६ दिवस उलटत आले तरी या विभागाला अतिरिक्त आयुक्तच नसल्याने महापालिकेला या पदाची आवश्यकता भासत नाही की सरकारला ही रिकामी खुर्ची भरायची इच्छा दिसत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील महापालिकेच्या विकासकामांसंदर्भात लोकांच्या समस्या या प्रशासनापर्यंत पोहाचवून समन्वय राखण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे पालकमंत्री (उपनगरे) मंगलप्रभात लोढा हे सांगत असले तरी प्रत्यक्षात अतिरिक्त आयुक्तांची ही रिकामी खुर्ची भरण्यासाठी भरण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा असे वाटत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.