मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ३ विद्यार्थिनींवर शाळेतील २३ वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी विक्रोळी पूर्व येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संतापलेल्या पालकांनी नराधम शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले असून विक्रोळी पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या शिक्षकाला बुधवारी विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सौरव दीपक उचाटे (२३) असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. सौरव उचाटे मुंबई महानगर पालिकेच्या विक्रोळी येथील शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण (पीटी) शिकवत होता. ठाण्यात राहणा-या या शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ३ विद्यार्थिनींना पीटीच्या तासांच्या वेळी एकेक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार तसेच अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार मागील आठ दिवसांपासून सुरु होता. मंगळवारी शाळा सुटल्यावर एका विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला असता पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी या शिक्षकाला जाब विचारत असताना उर्वरित दोन पीडित विद्यार्थिनी पुढे आल्या आणि आमच्यासोबत देखील असेच केल्याची तक्रार करताच संतापलेल्या पालकांनी शिक्षक सौरव याला चोप देण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रकाश राज यांना चंद्रयान मोहिमेची खिल्ली उडवणे भोवले; पोलिसांत तक्रार दाखल
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, दरम्यान पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकाची तक्रार दाखल करून शिक्षक सौरव दीपक उचाटे याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचारसह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या शिक्षकाला बुधवारी विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community