Chandrayaan-3 लँडिंगच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

125

इस्त्रो (ISRO) अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची तिसरी अभ्यासात्मक चंद्र मोहीम असलेले चंद्रयान-3  ही बुधवार, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा क्षण अधोरेखित करण्यासाठी अनेक संस्थांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, पुणे, यांनी लॉ कॉलेज रोडवरील एनएफडीसी-एनएफएआय थिएटर येथे आणि एनएफडीसी – नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबई यांनी पेडर रोडवरील एनएफडीसी – एनएमआयसीमधील जेबी हॉलमध्ये चंद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे. बुधवार, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून एनएफडीसी – एनएफएआय आणि एनएफडीसी – एनएमआयसी परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी संध्याकाळी 5:27 वाजता चंद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.

एनएफएआय इथल्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठातील इस्त्रो विभागाचे संचालक डॉ. अरविंद डी शाळीग्राम,  विविध महाविद्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांसह पुण्यामधील शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे शहरातील विद्यार्थी अत्यंत उत्सुक आहेत. मुंबईत, एनएमआयसी इथल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात काम करणारे मुंबईकर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतले नेहरू सायन्स सेंटर देखील चंद्रावर 3 चे ऐतिहासिक लँडिंग साजरे करण्यासाठी माहितीपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. कार्यक्रमांची सुरुवात दुपारी 2:00 ते 4:00 या वेळेत चंद्रयान 3 चे पेपर मॉडेल तयार करण्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या कार्यशाळेने होईल. चंद्रयान 3 चे स्वतःचे पेपर मॉडेल तयार करण्यासाठी उत्सुक असलेले 50 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रकाश राज यांना चंद्रयान मोहिमेची खिल्ली उडवणे भोवले; पोलिसांत तक्रार दाखल)

या सत्रानंतर संध्याकाळी 4:30 ते 7:00 या वेळात केंद्राने संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई इथले माजी शास्त्रज्ञ प्राध्यापक मयंक एन वाहिया, चांद्रयान 3 मोहिमेची सखोल माहिती देतील. हे सत्र उपस्थितांना अद्ययावत ज्ञान आणि मौल्यवान माहितीने समृद्ध करेल. त्याशिवाय, उपस्थितांना केंद्राच्या सभागृहात चांद्रयान 3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल. अंदाजे 400 जणांनी केलेल्या नोंदणीवरून या कार्यक्रमाला मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद दिसून येतो.

रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण, नागपूर येथे सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत डॉ. जी. श्रीनिवासन, वैज्ञानिक-अभियंता, प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर (केंद्रीय) – इस्रो, नागपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर एसओएस सभागृहात प्रज्ञान रोव्हर मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल आणि 12 ते 12:45 या वेळेत चंद्राच्या विशेष वैशिष्ट्यांवरील एक कार्यक्रम होईल. संध्याकाळी 5 वाजल्यापासून चांद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल.

चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यात चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळाले, तर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातील चौथा देश असेल, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून, तो साजरा करायला हवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.