- ऋजुता लुकतुके
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ८.३ टक्के असेल असा स्टेट बँकेचा अंदाज आहे. बँकेच्या मुख्य अर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी ताज्या अहवालात तसा अंदाज वर्तवला आहे. बँकेनं ३० निकषांवर आधारित विकासदर मोजणारी आर्टिफिशिअल न्यूट्रल नेटवर्क ही प्रणाली विकसित केली आहे. एएनएन असं या प्रणालीला संबोधण्यात येतं. या प्रणालीने विकासदराचा हा अंदाज व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर संपूर्ण आर्थिक वर्षाचा विकासदर हा ६.७ टक्क्यांच्या आसपास असेल, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही अंदाज अगदी रिझर्व्ह बँकेनं वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही जास्त आहेत. एप्रिल ते जून २०२२ तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर १३ टक्के होता. त्यानंतर हा देशाचा सर्वाधिक विकासदर असेल. २०२२ मध्ये बेस वर्षात केलेल्या बदलामुळे विकासदर वाढला होता. आताचा हा फक्त अंदाज आहे.
देशाचे जीडीपी आकडे याच महिन्यात ३१ ऑगस्टला जाहीर होणार आहेत. आणि रिझर्व्ह बँकेनं हा दर ८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदर ६.५ टक्के असेल अशा मध्यवर्ती बँकेचा अंदाज आहे.
(हेही वाचा – World Wrestling Championship : बजरंग आणि दीपक पुनियाला निवड चाचणी स्पर्धा न खेळण्याची मुभा)
देशाचा जीडीपी मोजताना यात सरकारने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केलेला खर्चही मोजला जातो. आणि आर्थिक वर्ष सुरू होताना सरकारी तिजोरीचा हात नेहमीच सढळ असतो. यंदा केंद्रसरकार आणि राज्यसरकारांनीही २.७८ लाख कोटी रुपये विविध योजनांवर खर्च केले आहेत. केंद्राच्या पाठोपाठ आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांनीही आपल्या खर्चात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढ केली आहे.
तर केंद्रीय स्तरावर एकूण १० लाख कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी २८ टक्के रक्कम सरकारने खर्च केली आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट स्तरावर कंपन्यांनी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आणि गेल्यावर्षीच्या तुलनेत सरकारी आणि मोठ्या कंपन्यांचे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले असल्याचं निरीक्षण स्टेट बँकेच्या आर्थिक सल्लागार सौम्या घोष यांनी नोंदवलं आहे.
‘कंपन्यांचा निव्वळ नफा वाढला आहे. आणि त्याचा परिणाम देशाचं एकत्रित उत्पन्न वाढण्यात होणार आहे. ३००० कंपन्यांचे निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले आहेत,’ असं सौम्या यांनी अहवालात म्हटलं आहे. या दोन कारणांमुळे देशाचा जीडीपी विकासदर ८ टक्क्यांच्या घरात असेल असं तज्जांना वाटतंय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community