Narendra Modi In Brics : पंतप्रधान मोदी यांचे देशप्रेम पाहून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही झुकले

188
Narendra Modi In Brics : पंतप्रधान मोदी यांचे देशप्रेम पाहून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही झुकले
Narendra Modi In Brics : पंतप्रधान मोदी यांचे देशप्रेम पाहून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षही झुकले

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशप्रेमाचे दर्शन घडवले. परिषदेच्या पहिल्या सत्रात जेव्हा पंतप्रधान मोदी फोटोसाठी स्टेजवर पोहोचले, तेव्हा त्यांना जमिनीवर ठेवलेला तिरंगा दिसला. इतर देशांचे ध्वजही येथे ठेवण्यात आले होते. सर्व नेत्यांना त्यांची जागा कळावी, यासाठी अशा प्रकारे ध्वज ठेवण्यात आले होते. स्टेजवर पोहोचताच पंतप्रधान मोदींनी तिरंगा उचलला आणि खिशात ठेवला. ते पाहताच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही आपल्या देशाचा ध्वज जमिनीवरून उचलला. त्या नंतर एक सहाय्यक दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रध्यक्षांकडे ध्वज घेण्यासाठी आल्यावर त्यांनी तो दिला, पंतप्रधान मोदी यांनी मात्र तो स्वतःच्या खिशात ठेवल्याचे सांगून सहाय्यकाकडे देण्यास सहजतेने नकार दिला. पंतप्रधानंची ही कृती देशवासियांना भावली आहे. सामाजिक माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

(हेही वाचा – Talathi Exam : तलाठी परीक्षेला इलेक्ट्रॉनिक गॅजेट न्याल तर ,होईल फौजदारी कारवाई)

२ दशकांतील अद्भुत प्रवास

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या नेत्यांना संबोधित करत त्यांच्यासमोर ५ प्रस्ताव मांडले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोहान्सबर्गसारख्या सुंदर शहरात पुन्हा एकदा येणे माझ्यासाठी आणि माझ्या शिष्टमंडळासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या शहराचा भारतातील लोकांशी आणि भारताच्या इतिहासाशी खोलवर संबंध आहे. महात्मा गांधींनी 110 वर्षांपूर्वी बांधलेले टॉल्स्टॉय फार्म इथून काही अंतरावर आहे. गेल्या जवळपास २ दशकांमध्ये ब्रिक्सने खूप मोठा आणि गौरवशाली प्रवास केला आहे. या प्रवासात आपण भरपूर यश मिळवले आहे. आमची न्यू डेव्हलपमेंट बँक ग्लोबल साउथच्या देशांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही ब्रिक्स देशांतील सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहोत. ब्रिक्सच्या अजेंड्याला नवी दिशा देण्यासाठी, भारताने रेल्वे संशोधन नेटवर्क, एमएसएमईंमधील घनिष्ठ सहकार्य, ऑनलाइन ब्रिक्स डेटाबेस, स्टार्टअप फोरम यासारख्या कल्पना मांडल्या. या विषयांवर लक्षणीय प्रगती होणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान मोदींनी सूचना केल्या

आमचे सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी मी काही सूचना तुमच्यापुढे ठेवू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रथम अंतराळ क्षेत्रातील सहकार्य आहे. आम्ही आधीच ब्रिक्स उपग्रह नक्षत्रमंडळावर काम करत आहोत. एक पाऊल पुढे टाकत, आम्ही ब्रिक्स स्पेस एक्सप्लोरेशन कंसोर्टियम तयार करण्याचा विचार करू शकतो. या अंतर्गत आपण अंतराळ संशोधन, हवामान निरीक्षण, जागतिक हितासाठी काम करू शकतो. दुसरी सूचना म्हणजे शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य. ब्रिक्स ही भविष्यातील तयार संघटना बनवण्यासाठी, आपल्याला आपल्या समाजाचे भविष्य तयार करावे लागेल. यामध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतात आम्ही दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी DIKSHA म्हणजेच डिजिटल पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. तसेच, शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीला चालना देण्यासाठी आम्ही देशभरात 10,000 अटल टिंकरिंग लॅबची स्थापना केली आहे. भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी भारतात AI आधारित भाषा कार्यक्रम वापरले जात आहेत.

मोठ्या मांजरांबाबतही सूचना देण्यात आल्या

तिसरी सूचना आहे की एकमेकांची ताकद ओळखण्यासाठी आपण एकत्र कौशल्य विकास करू शकतो. यातून आपण एकमेकांना पूरक ठरू शकतो. माझी चौथी सूचना मोठ्या मांजरींबाबत आहे. ब्रिक्सच्या पाचही देशांमध्ये विविध प्रजातींच्या मोठ्या मांजरी मोठ्या प्रमाणात आढळतात. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अंतर्गत, आपण त्यांच्या संरक्षणासाठी संयुक्त प्रयत्न करू शकतो. माझी पाचवी सूचना पारंपारिक औषधांबद्दल आहे. आपल्या सर्व देशांत पारंपारिक औषधांची परिसंस्था आहे. आपण मिळून पारंपारिक औषधांचे भांडार तयार करू शकतो का ? दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल साऊथच्या देशांना ब्रिक्समध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. ही देखील सध्याच्या काळाची गरज आहे. भारताने आपल्या G20 अध्यक्षकाळात या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.