मुंबईतील चेंबूर परिसरातील रहिवासी असलेल्या ७९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. उपचारानंतर रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. रुग्णाला १९ जुलै पासून ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणे होती. वयोमानामुळे रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थॅलेसेमिया मायनर हे आजार आहेत. रुग्णाची वीस वर्षांपूर्वी एन्जोप्लास्टी करण्यात आली होती. १९ जुलै पासून रुग्ण बराच होत नसल्याने त्याचे नमुने पालिकेने पुण्यातील नॅशनल व्हायरल इन्स्टिट्यूटला पाठवले होते. नॅशनल व्हायरल इन्स्टिट्यूटने रुग्णाच्या शरीरात झिका व्हायरसचे निदान केले. रुग्णाने आजारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. २ ऑगस्ट रोजी रुग्ण बरा होऊन घरी परतला.
चेंबूरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने बाधित रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले. अधिकाऱ्यांना मात्र परिसरात कोणताही नवीन संशयित रुग्ण आढळला नाही. रुग्णाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पालिका अधिकाऱ्यांना एडिस डासांची उत्पत्ती दिसून आली. अधिकाऱ्यांनी तातडीने एडिस डासांच्या जागेचा नायनाट केला तसेच डास नियंत्रण उपायोजना राबवल्या. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
एडिस व्हायरसबद्दल –
झिका आजार झिका व्हायरसमुळे होतो. हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो. झिका आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. झिका डास डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविड सारखा वेगाने पसरत नाही.
लक्षणे –
ताप, त्वचेवर पुरळ येणे, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी. झिका व्हायरस रोग हा एक स्वयं मर्यादित आजार आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती लक्षणे विरहित असतात. या आजाराच्या चाचणीची सुविधा महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे.
(हेही वाचा – Chandrayan 3 : नासाकडून कौतुक; भारत जगातील चौथा देश बनल्याची कबुली)
नागरिकांना आवाहन –
- नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा.
- वापरात नसलेले सर्व कंटेनर, चंक मटेरियल, टायर, नारळाचे गोळे इत्यादींची विल्हेवाट लावा. शक्यतो नष्ट करा.
- घर आणि हॉटेलमध्ये शोभेच्या टाक्यांमध्ये लाव्हीव्हरी माशांचा वापर करा.
- साप्ताहिक ड्राय डे साजरा करा. घरात किंवा उपहारगृहात आठवडाभर पाणी धरून ठेवणारे सर्व कंटेनर स्वच्छ धुवा आणि रिकामे करा.
स्वसंरक्षणासाठी –
झिका व्हायरस डासाच्या चाव्यापासून वाचण्यासाठी घरी किंवा रुग्णालयात बेडनेटचा वापर करा. डास प्रतिबंधक औषध घरात लावा. अंग संपूर्ण झाकेल असे कपडे घाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community