गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचे स्मारक असलेल्या परिसराला स्वराज्य भूमी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेव्हापासून या स्वराज्य भूमीची जागा विकसित करण्याची मागणी होत हाती, परंतु तब्बल ११ वर्षांनी ही स्वराज्य भूमी विकसित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून पुढील 2 महिन्यांमध्ये या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला. टिळकांचे स्मारक असलेल्या स्वराज्य भूमीचा विकास करताना त्या ठिकाणी प्रत्येक झाडांवर विद्युत रोषणाईद्वारे टिळकांचे छायाचित्र प्रदर्शित केले जाणार असून याचद्वारे स्वातंत्र्य संग्रामात बलीदान देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांचीही छायाचित्रेही प्रदर्शित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Pragyanand vs Carlsen : बुद्धिबळ विश्वचषक अंतिम फेरीचा दुसरा सामनाही अनिर्णित, टायब्रेकर ठरवणार विजेता)
गिरगाव चौपाटीवरील टिळकांचे स्मारक असलेल्या स्वराज्य भूमीचा विकास करण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासमवेत भाजप खासदार गोपाळे शेट्टी यांनी बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, माजी नगरसेवक कमलेश यादव, विनोद शेलार आदी, दिपक तावडे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गोपाळ शेट्टी यांनी याची माहिती देताना, सन २०१२ रोजी आपण तत्कालिन महापौर सुनील प्रभू यांच्याकडे या गिरगाव चौपाटी ही लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून या स्वराज्य भूमीच्या नावासाठी तसेच या परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याने या स्वराज्य भूमीच्या विकासासाठी पुन्हा एकदा आपण प्रयत्न करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये हायपॉवर कमिटीला त्वरीत पुढील बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या असून या भूमीच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ही भूमी विकसित करण्यासाठी आराखडा तयार करून त्याठिकाणी झाडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गो गो लाईट प्रोजेक्टशन अर्थात झाडावर विद्युत रोषणाईवर टिळकांचे छायाचित्र प्रदर्शित केले जाईल. याशिवाय पाण्याच्या कारंजावर टिळकांसह राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. त्याबरोबरच अंतर्गत चालण्याचे पाथ वे, तसेच टिळकांसह स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर राष्ट्रपुरुषांचे म्युरलही याठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नामांकित वास्तू विशारदामार्फत खुल्या उद्यानाचे संकल्पचित्र बनवून मुंबई शहरातील क्रांतीकार व देशासाठी बलिदान दिलेल्या विरांचे तथा लोक नेत्यांचे यथोचित स्मारक स्वराज्य भूमी या ठिकाणी विकसित केले जाणा असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यामध्ये कोणतेही राजकारण न करता राष्ट्रपुरुषांच्या प्रती असलेल्या आदर आणि देशप्रेम भावनेने हा विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.
मढच्या सिल्व्हर बीचचेही सुशोभिकरण
मालाड मढ येथील सिल्व्हर बीचवरील पर्यटकांची वाढती संख्या पाहता हा सिल्व्हर बिचही विकसित करून त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याच धर्तीवर मनोरी आणि गोराई या दोन चौपाटीचाही विकास केला जाणार असल्याचेही गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. येथील मढ किल्ला ५०० ते ६०० वर्षे जुना असून याचीही डागडुजी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासर्व कामांसाठी सीआरझेड आणि एअरफोर्सची परवानगी प्रलंबित असून त्यांची परवानगी प्राप्त होताच या कामाला सुरुवात होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटकांची वाढती संख्या पाहता त्याठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीलाही परवानगी देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. याला आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community