राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार सोबत घेऊन युती सरकारमध्ये सहभागी झाले, मात्र त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार शरद पवार यांची भेट घेत असतात. त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. पवारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे का, अशी चर्चा सुरु झाली होती. अशातच बुधवार, २३ ऑगस्ट रोजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मविआच्या पक्षातील नेत्यांची बैठक झाली आणि पवारांनी त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूषवणार आहेत. ‘इंडिया’च्या बैठकीच्या आयोजनाबाबत आघाडीच्या नेत्यांची बैठक ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची बैठक झाली होती. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात आणि २३ ऑगस्ट रोजी मविआची आणखी एक बैठक पार पडली. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे सलग दोन दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ‘ग्रँड हयात’ या हॉटेलमध्ये ही परिषद होणार आहे. या परिषदेला देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे तब्बल १५० नेते उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा Chandrayan 3 : नासाकडून कौतुक; भारत जगातील चौथा देश बनल्याची कबुली)
Join Our WhatsApp Communityमुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राजदचे लालू प्रसाद यादव आदी नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची रणनीती, एकास एक उमेदवार उभा करणे या मुद्दय़ांवर दोन दिवसांच्या बैठकीत सखोल चर्चा केली जाईल.