P.L. Deshpande : पु.ल. देशपांडे लिखीत ‘एक झुंज वार्‍याशी’ २५वा प्रयोग रसिकांसाठी केवळ २५ रुपयांत

249
महाराष्ट्रभूषण पु.ल. देशपांडे यांचे एक वेगळे व उत्तम नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचावे या भावनेतून व्हिजन संस्थेच्या माध्यमातून श्रीनिवास नार्वेकर यांनी निर्मिती केलेल्या ‘एक झुंज वार्‍याशी’ या प्रायोगिक नाटकाचा २५वा प्रयोग प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरामध्ये साजरा होत आहे. विशेष म्हणजे येत्या शुक्रवारी, २५ ऑगस्टला साजरा होणार्‍या या २५व्या प्रयोगाचे प्रवेश मूल्यही अवघे २५ रुपये ठेवण्यात आले आहे. व्हिजन निर्मित या नाटकाच्या पंचविशीच्या निमित्ताने त्याचे सलग सहा प्रयोग २५ ते २९ ऑगस्ट या कालावधीमध्ये मुंबईत होत आहेत.
रशियन नाटककार वलादलीन दोझोर्त्सेवच्या ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या नाटकाचे रुपांतर पु.ल. देशपांडे यांनी ‘एक झुंज वार्‍याशी’ नावाने केले. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीच्या या नाटकातील संदर्भ आजही बदललेले नाहीत. एका व्यक्तीवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारुन न्याय मागण्यासाठी एक सर्वसामान्य माणूस थेट मंत्र्याच्या केबिनमध्ये घुसून त्याचा राजीनामा मागतो. सर्वसामान्य माणसाला प्रश्न विचारण्यासाठी व विचार करण्यासाठी हे नाटक प्रवृत्त करते.
आजपर्यंत मुंबई, पुणे, बेळगाव, गोवा, दिल्ली, नागपूर येथे या नाटकाचे प्रयोग झाले असून संगीत नाटक अकादमीच्या नाट्यमहोत्सवात तसेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या ‘भारंगम’ या राष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये या नाटकाची निवड झाली होती. ज्येष्ठ समीक्षक जयंत पवार यांच्यासह अनेक समीक्षकांनी या नाटकाची व प्रयोगाची वाखाणणी केली आहे. रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकामध्ये स्वत: श्रीनिवास नार्वेकरांसह ज्येष्ठ अभिनेते सुगत उथळे, आशुतोष घोरपडे व शोभना मयेकर अन्य महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. यापूर्वी या नाटकामध्ये ज्येष्ठ मालिका व नाट्य अभिनेते दीपक करंजीकर महत्वाची भूमिका करीत असत. मात्र त्यांच्या कार्यबहुल्यामुळे यानंतर करंजीकर व सुगत उथळे आलटून पालटून या नाटकातली महत्वाची भूमिका करणार आहेत.
सुमारे एक हजारच्या जवळपास नाटकांचे नेपथ्य केलेले शासनाचा जीवनगौरव पुरस्कार विजेते ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते रंगभूषाकार उलेश खंदारे यांनी वेशभूषा केली आहे. या प्रयोग मालिकेसाठी जाई काजळ सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत, तर सुप्रिया प्रॉडक्शन्स व मल्हार या सहयोगी संस्था आहेत.
व्हिजन निर्मित या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोग मालिकेमध्ये प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरमधील २५ ऑगस्ट रोजी होणार्‍या २५व्या प्रयोगाबरोबरच शनिवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.१५ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी रविवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, सोमवार, २८ ऑगस्ट रोजी रात्रौ ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह, बोरीवली, मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल आणि बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सायं. ४.१५ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे प्रयोग होत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.