- ऋजुता लुकतुके
गुरुवार २४ ऑगस्टपासून विश्वचषकाची तिकीट विक्री सुरू होणार आहे. आणि यंदा तिकिटं ऑनलाईन पद्धतीने बुक माय शो वेबसाईटवर उपलब्ध होतील. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची तिकिटं येत्या २४ ऑगस्टपासून बुक माय शो वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेचे आयोजक बीसीसीआयने ही माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘तिकीट विक्री कुठलीही गडबड होऊ नये आणि सुरळीतपणे ती लोकांना मिळावीत यासाठी यंदा ऑनलाईन पद्धतीने तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. आयसीसीचे स्पर्धा सहयोजक असलेल्या मास्टरकार्ड कंपनीच्या ग्राहकांना तिकिटं खरेदीसाठी विशेष २४ तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. तर तारखेनुसार, तिकीट विक्रीचे चार टप्पे आखण्यात आले आहेत,’ असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
‘मास्टरकार्डच्या ग्राहकांसाठी तिकीट विक्री २४ ऑगस्टपासून सुरू होतेय. तर इतर सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एक दिवस नंतर म्हणजे २५ ऑगस्टला विक्री सुरू होईल. सर्वसमावेशक पद्धतीने ही तिकीट विक्री पार पडेल. म्हणजे सर्व वर्गाच्या लोकांना विश्वचषकाचा आनंद घेता येईल अशा प्रकारे तिकिटाचे दर ठरवण्यात आले आहेत,’ असं आयसीसीचे ख्रिस टेटली यांनी सांगितलं.
एकदिवसीय विश्वचषकासाठी तिकीट विक्रीचं वेळापत्रक
बीसीसीआयने सांगितलेले ४ टप्पे असे आहेत,
२४ ऑगस्ट – संध्याकाळी ६ पासून मास्टरकार्ड ग्राहकांसाठी प्री-सेल (सराव सामने आणि भारतीय संघाचे सामने वगळून)
२९ ऑगस्ट – संध्याकाळी ६ पासून मास्टरकार्ड ग्राहकांसाठी प्री-सेल (सराव सामने वगळून भारतीय संघाचे सामने)
१४ सप्टेंबर – संध्याकाळी ६ पासून मास्टरकार्ड ग्राहकांसाठी उपान्त्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामने
२५ ऑगस्ट – संध्याकाळी ८ पासून भारतीय संघ वगळून सर्व सराव आणि मुख्य स्पर्धेतील सामने
३० ऑगस्ट – संध्याकाळी ८ पासून गुवाहाटी व थीरुअनंतपुरममधील भारतीय संघाचे सामने
३१ ऑगस्ट – संध्याकाळी ८ पासून भारतीय संघाचे चेन्नई, दिल्ली आणि पुण्यातील सामने
१ सप्टेंबर – संध्याकाळी ८ पासून भारतीय संघाचे धरमशाला, लखनौ आणि मुंबईतील सामने
२ सप्टेंबर – संध्याकाळी ८ पासून भारतीय संघाचे बंगळुरू आणि कोलकाता येथील सामने
३ सप्टेंबर – संध्याकाळी ८ पासून भारतीय संघाचे अहमदाबाद येथील सामने
१५ सप्टेंबर – संध्याकाळी ८ पासून उपान्त्य आणि अंतिम फेरीतील सामने
(हेही वाचा – Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण…)
२९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर १९ नोव्हेंबरला रंगणार आहे. सराव सामने धरून एकूण ५८ सामने या कालावधीत होणार आहेत. भारतातील एकूण १२ शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने रंगतील.
विश्वचषकासाठीची तिकीट विक्री सुरू होत असली तरी आतापर्यंत स्पर्धेच्या वेळापत्रकातील गोंधळामुळे विक्री रखडलेलीच होती. आधी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा होणं अपेक्षित होतं. पण, स्पर्धेसाठीची पात्रता स्पर्धा वेळेत होऊ शकली नाही, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये स्पर्धा भरवावी लागली.
त्यानंतर दिवाळी आणि नवरात्रीच्या सणांमुळे एकूण ९ सामन्यांची ठिकाणं आणि वेळा बदलाव्या लागल्या. एरवी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची तिकीटविक्री एक वर्ष आधी सुरू होते. आणि खासकरून भारत-पाकिस्तान सारख्या सामन्यांची तिकिटं पहिल्या काही तासातच संपतात. आता या तिकीट विक्रीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळयांचं लक्ष असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community