पदपथ विक्रेत्यांना (फेरीवाला) व्यवसायासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत असतानाच आता मुंबईतील मासे विक्रेते, बचत गटांतील व्यावसायिक महिला तसेच अर्धवेळ विक्रेत्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही चहल यांनी दिल्या असून लवकरच याबाबतची कार्यवाही प्रभाग कार्यालय स्तरावर केली जाणार आहे.
मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात पथविक्रेते अर्थात फेरीवाले असून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार फेरीवाल्याला प्रत्येकी १० हजार रुपये आणि या कर्जाची परतफेड केल्यानंतर त्यांना २० हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी ते प्रयत्न करत करू शकतात. मुंबईत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ३८ हजार इतक्या अर्जदारांना कर्ज मिळण्याकरिता शिफारस पत्र मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी साधारणपणे एक लाख पथविक्रेत्यांना विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.
तसेच पुढील काळातही जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याबाबतचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी २४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी बैठक घेतली. या आढावा बैठकीस योजनेचे समन्वयक तथा उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे उप आयुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते. याप्रसंगी मुंबईत विभागनिहाय मेळावे सुरू करण्याचे निर्देश चहल यांनी या बैठकीत दिले.
मुंबईतील मासे विक्रेते, बचत गटांतील व्यावसायिक महिला तसेच अर्धवेळ विक्रेत्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांना व्यवसायासाठी या योजनेतंर्गत अर्थसहाय पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागात पथविक्रेते, फेरीवाले जास्त आहेत, त्या विभागात या योजने अंतर्गत जास्त उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारातील पथविक्रेत्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, असेही आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी सांगितले.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे अर्ज https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अद्याप ज्या पथविक्रेत्यांनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी ते व्यवसाय करीत असलेल्या संबंधित विभाग कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधून संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
(हेही वाचा – BRICS : ब्रिक्सचा विस्तार, आता ‘या’ सहा देशांचा समावेश)
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबाबत माहिती –
नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास त्या संबंधित पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.
येथे करा अर्ज –
संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या प्रधानमंत्री यांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटूंबास प्राप्त होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community