म्हणून मुंबईतील ‘ते’ सर्व मॉल बंद होणार!

ड्रीम मॉलच्या इमारतीला अंशत: भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी प्रयत्न केले.

146

भांडुपमधील ड्रीम मॉलमधील आगीच्या दुघर्टनेमध्ये सनराईज रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने याचे तीव्र पडसाद स्थाय समितीत उमटले. अनधिकृत बांधकाम असलेल्या मॉलच्या इमारतीला अंशत: भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी प्रयत्न केले. परंतु याबाबत इमारत प्रस्ताव विभागाच्या उपप्रमुख अभियंत्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही विद्यमान आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे परदेशी यांच्यासह चहलही तेवढेच या दुघर्टनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समितीने केला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व मॉलचे बांधकाम आराखड्यानुसार नसल्यास ते मॉल तात्काळ बंद करा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सनराईजला दिलेल्या ‘ओसी’ची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करा!

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विराेधी पक्षनेते रवी राजा यांनी भांडुपच्या ड्रीम मॉलमधील आगीमुळे सनराईज रुग्णालयातील ११ कोविडबाधित रुग्णांच्या झालेल्या मृत्यूबाबत हरकतीच्या मुद्दयाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मुंबई शहर आता आगींचे शहर बनल्याचे सांगत अग्निशमन दलाच्या सर्व जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु जे अधिकारी मॉल, रुग्णालय, नर्सिंग होमसह इतर उत्तुंग इमारतींचे आग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात तपासणी करताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास भाग पाडत नाही. परिणामी असे प्रकार घडत असल्याचे राजा यांनी सांगितले. एकदा नोटीस दिल्यानंतर ३ महिन्यांची वेळ देतो, तर त्यांनी न केल्यास कोणतीही पुढील कारवाई केली जात नाही. त्यामुळे याला आयुक्तांसह इमारत प्रस्ताव विभाग व अग्निश्मन दलाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप राजा यांनी केला. या मॉलमधील रुग्णालयात व्हॉट्सअपवरून एका दिवसांमध्ये परवानगी देण्यात आली आहे. एका बाजुला इज ऑफ डुईंग बिजनेसअंतर्गत ऑनलाईन परवानगी दिली जात असताना तत्कालिन आयुक्तांनी अंशत: ओसी मिळवून दिली. त्यामुळे याची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली.

सिटी मॉलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर मॉल्ससहित रुग्णालय व नर्सिंग होमची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. पण याची योग्यप्रकारे तपासणी झालेली नसून या घटनेमुळे प्रशासनाची माणसुकीच संपली आहे. ऑट्रीया मॉलमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे. पण कारवाईचे काय? जर यातील आगप्रतिबंधक यंत्रणांमध्ये त्रुटी आहेत तर मग  त्वरीत बंद करा. ऑट्रीयाच नाही तर मुंबईतील सर्व मॉलच्या बांधकामांचे आराखडे समोर घेवून बसा आणि ज्यांनी ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, ते सर्व बंद करा. तसेच निर्देश देवूनही त्याचे पालन न झाल्यास अग्निशमन दलाचे अधिकारी व इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती.

तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी नियम डावलले! 

समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनी या मॉलसंदर्भात उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) खानोलकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या अहवाल वाचून दाखवून या मॉलला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन होण्याची भीती त्यांनी तत्कालिन आयुक्तांकडे व्यक्त केली होती. या रुग्णालयाच्या संचालिकेने व्हॉट्सअपवरुन अर्ज केला होता आणि तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व नियम डावलून त्यांना परवानगी देण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश  दिला. आणि एका दिवसांमध्येही ही परवानगी दिली. कोविडच्या नावाखाली ही प्रविणसिंह परदेशी यांनी परवानगी दिली होती त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी येथील यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास आणूनही विद्यमान आयुक्तांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे परदेशी जरी नसले तरी विद्यमान आयुक्त चहल हे पदावर असून त्यांच्यावर याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही रईस शेख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरविकास खात्यातील प्रधान सचिवांमार्फत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

(हेही वाचा : वसई-विरारमध्ये अवैध कत्तलखाने! महापालिका मुख्यालयासमोर गोरक्षकांचे उपोषण!)

…तर उच्च न्यायालयात विरोधात जाणार!

ड्रीम मॉल व सनराईज हॉस्पिटलची दुघर्टना दुर्दैवी असून अपराधी भावनेने मी या मृतांना श्रध्दांजली वाहत असल्याचे सांगत भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी २ नोव्हेंबरलाच चिंता व्यक्त केली होती. जर नगरसेविकेला हे कळते, तर मग अधिकाऱ्यांना का कळत नाही, असा सवाल शिंदे यांनी केला. याप्रकरणी महापालिकेने कारवाई केली नाही तर आपण उच्च न्यायालयात विरोधात जाणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. तर सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी अलिकडे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगत याप्रकरणाची चौकशी कोण करतेय तर अग्निशमन दलाच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यामार्फत. अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांमध्येच एकमेकांची उणीधुणी काढण्यात जात आहे. ते कुणाची चौकशी करणार असा सवाल राऊत यांनी केला. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडीटप्रमाणे इमारतींचे आग प्रतिबंधक यंत्रणांचेही ऑडीट केले जावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या राखी जाधव आणि भाजपचे विनोद मिश्रा आदींनी भाग घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.