ऋजुता लुकतुके
बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Badminton Championship) पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय तर पुरुषांच्या दुहेरीत सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने उपउपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा अजून जिवंत आहेत. त्याचवेळी लक्ष्य सेन आणि महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि त्रिसा यांचे आव्हान संपुष्टात आले.
साईराज आणि चिराग ही जोडी सध्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची जोडी आहे. त्यांनी इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनिएल मार्फिन या जोडीचा ३ गेममध्ये २१-१५, १९-२१ आणि २१-९ असा पराभव केला. खरेतर संपूर्ण सामन्यावर भारतीय जोडीचेच वर्चस्व होते. दुसऱ्या गेममध्ये त्यांच्याकडून सुरुवातीला चुका झाल्या. त्याचा फायदा घेत इंडोनेशियन जोडीने या गेममध्ये आघाडी मिळवली. साईराज आणि चिराग यांनी थोड्यावेळातच आपला खेळ सावरला. अखेरीस हा गेम दोघांना १९-२१ असा गमावावा लागला.
(हेही वाचा – Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये…)
तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा भारतीय जोडीने आक्रमक सुरुवात केली. साईराज आणि चिराग यांचा नैसर्गिक खेळ आक्रमक आहे. तो रोखला नाही तर त्यांना खेळणं अवघड जातं. उलट त्यांना आक्रमण करू दिलं नाही, तर अस्वस्थ होऊन त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. दुसऱ्या गेममध्ये इंडोनेशियन संघाला भारतीय जोडीला रोखणं जमलं. पण, तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा पहिल्या गुणापासून वर्चस्व राखत साईराज आणि चिरागने सामना जिंकला. या जोडीने यंदाच्या वर्षी राष्ट्रकूल विजेतेपदासह चार सुपरसीरिज स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांना कांस्य पदक मिळाले होते. आताही त्यांच्याकडून पदकाचीच अपेक्षा आहे.
साईराज आणि चिराग उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले असताना महिला दुहेरीत मात्र गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली यांचा पराभव झाला. अव्वल मानांकित चायनीज जोडी चेंग किन चेंग आणि जिया यि फान यांनी त्यांचा १४-२१ आणि ९-२१ असा पराभव केला. गायत्री आणि त्रिसा यांनी अलीकडेच ऑल इंग्लंड स्पर्धेत उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. आणि त्यावेळी त्यांनी चायनीज जोडीचाही पराभव केला होता. पण ती चमक दोघींना पुन्हा एकदा दाखवता आली नाही. फक्त ४२ मिनिटांत त्यांचा धुव्वा उडाला.
पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेनचा उपान्त्यूपूर्व फेरीत पराभव झाला, तर एच एस प्रणॉयने माजी चॅम्पियन लोह किन यूचा २१-१८, १५-२१ आणि २१-१९ असा पराभव केला. दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ होते. त्यामुळे सामन्यात रंगत आली. पण, महत्त्वाचं म्हणजे अनुभवी खेळाडूबरोबर खेळताना प्रणॉय डगमगला नाही. चुरशीच्या सामन्यातही तो गडबडून गेला नाही. उलट मोक्याच्या क्षणी सामन्यांवर ताबा ठेवत प्रणॉयने सामना जिंकला.
प्रणॉयने यावर्षी मलेशियन मास्टर्स ही महत्त्वाची सुपरसीरिज जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा तो उपविजेता आहे. आता उपान्यपूर्व फेरीत प्रणॉयची गाठ व्हिक्टर एक्सेलसनशी पडणार आहे. लक्ष्य सेनला तिसऱ्या फेरीत तीन गेमनंतर विदितसार्नने २१-१४, १६-२१ आणि २१-१३ असे हरवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community